कारवाई न करण्यासाठी लाच मागणारा उत्पादन शुल्क अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

 

जळगाव समाचार | १८ डिसेंबर २०२५

रावेर तालुक्यातील खानापूर परिसरात कारवाई न करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या दुय्यम निरीक्षकाला खासगी पंटरसह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात अटक केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक विजय पाटील आणि त्यांचा खासगी पंटर भास्कर चंदनकर यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या वडिलांविरोधात यापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई केली होती. या प्रकरणात पुढील कारवाई न करण्यासाठी दुय्यम निरीक्षक विजय पाटील यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर एसीबीचे उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी विशेष पथक गठीत करून सापळा रचला.

ठरल्याप्रमाणे खानापूर येथे लाचेची रक्कम पंटर भास्कर चंदनकर याच्याकडे देण्यास सांगण्यात आले होते. चंदनकरने दहा हजार रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात अटक केली. त्यानंतर दुय्यम निरीक्षक विजय पाटील यांनाही ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. विजय पाटील हे रावेर तालुक्यातील आंतरराज्यीय सीमा तपासणी नाक्यावर कार्यरत होते. ही संपूर्ण कारवाई उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखालील एसीबी पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here