जळगाव समाचार | २२ एप्रिल २०२५
‘फँड्री’ चित्रपटातील शालूची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री राजेश्वरी खरात सध्या तिच्या धर्मांतरामुळे चर्चेत आली आहे. ‘ईस्टर संडे’नंतर तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचे फोटो पोस्ट केले होते. या फोटोंमध्ये ती आणि तिचे कुटुंबीय पांढऱ्या कपड्यांमध्ये दिसून येत होते, त्यामुळे त्यांनीही धर्मांतर केल्याचे स्पष्ट झाले.
फोटो पोस्ट होताच अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. काहींनी तिच्यावर पैशासाठी धर्म बदलल्याचा आरोप केला. या टीकांना उत्तर देताना राजेश्वरीने एक पोस्ट केली होती.
राजेश्वरी खरातची पोस्ट –
‘निवडणुका- प्रत्येकी 500 रुपये, किराणा भरून पिशव्या, दारू व हॉटेलला जेवण आणि साहेब, दैवत, देवमाणूस.. हे आज जात/ धर्म शिकवायला आले आहेत, तुमचं स्वागत आहे. कोणी पैशांसाठी किंवा अन्नासाठी दुसरा धर्म स्वीकारतात तर कोणी मतदान करतात. माझ्या मते एकतर दोघं बरोबर किंवा दोघंही चुकीचे,’ असं तिने लिहिलंय. त्याचसोबतच या पोस्टच्या अखेरीस तिने एक टीपसुद्धा लिहिली आहे. ‘टीप: माझा जन्म ख्रिस्ती कुटुंबातील आहे आणि मी सर्व धर्मांचा आदर करते. बाकी वरील पोस्ट मनोरंजक हेतूने स्विकारली जावी एवढी विनंती’, असं तिने म्हटलंय. मात्र नंतर तिने तिचे फोटो आणि उत्तराची पोस्टही इन्स्टाग्रामवरून हटवली.
राजेश्वरीने धर्मांतर करताना एक धार्मिक वाक्य कॅप्शनमध्ये लिहिलं होतं – “कारण तुमच्यासाठी माझ्या योजना मला माहीत आहेत, असं परमेश्वर म्हणतो.” पण या फोटोंवरून सुरू झालेल्या ट्रोलिंगमुळे तिने आपली मतं आणि फोटो हटवले आहेत.
सध्या सोशल मीडियावर तिच्या या निर्णयावर सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.