जळगाव समाचार | १९ ऑक्टोबर २०२५
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी गोरेगाव येथील दिवाळी मेळाव्यात केलेल्या भाषणामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बोलताना त्यांनी मराठी भाषा, संस्कृती आणि हक्कांच्या संरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा जोमाने उपस्थित केला. “मुंबई ही मराठी माणसाची आहे, पण आज गुजराती भाई आमच्या नोकऱ्या आणि व्यवसाय घेत आहेत. मराठी भाषेला प्राधान्य द्या, नाहीतर महाराष्ट्रातून मराठीच गायब होईल,” असे ठाकरेंनी ठामपणे सांगितले.
राज ठाकरेंनी आपल्या भाषणात गुजराती आणि मराठी समुदायांमध्ये एकता असल्याचे नमूद केले, मात्र मराठी हक्कांच्या रक्षणासाठी सज्ज राहण्याचे आवाहनही केले. त्यांनी निवडणूक आयोगाच्या काही धोरणांवरही टीका केली, परंतु संपूर्ण भाषणाचा केंद्रबिंदू मराठी अस्मिता आणि स्थानिक हक्क हा होता.
दरम्यान, विरोधकांनी राज ठाकरेंच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली असून, ते समाजात विभागणी निर्माण करणारे असल्याचा आरोप केला आहे. तर, मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या या भाषणाचे स्वागत करत “मराठी स्वाभिमानाचे पुनरुज्जीवन” असे वर्णन केले आहे. या वक्तव्यामुळे मुंबईच्या राजकीय वातावरणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

![]()




