‘सत्याचा मोर्चा’त राज ठाकरेंचा घणाघात : दुबार मतदारांचे ढीगभर पुरावे सादर करत सत्ताधाऱ्यांना थेट सवाल

 

जळगाव समाचार | १ नोव्हेंबर २०२५

महाविकास आघाडीप्रणीत विरोधी पक्षांच्या ‘सत्याचा मोर्चा’ने शनिवारी मुंबईत प्रचंड उत्साहात शक्तिप्रदर्शन केले. फॅशन स्ट्रीट ते मुंबई महानगरपालिका भवन या दरम्यान निघालेल्या मोर्चात हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांची गर्दी झाली होती. पालिका भवनासमोर झालेल्या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर तीव्र हल्लाबोल करत दुबार मतदारांच्या घोटाळ्याचे ठोस पुरावे सादर केले.

राज ठाकरे म्हणाले, “दुबार मतदारांची तक्रार आम्ही करतो आहोत, उद्धव ठाकरे करतात, शरद पवार करतात, काँग्रेस, कम्युनिस्ट, अगदी भाजप आणि शिंदे-आजित पवार गटाचे लोक सुद्धा करतात. मग तपास थांबवला कुणी? आणि तरीही निवडणुका घेण्याची एवढी घाई का आहे? मतदारयाद्या शुद्ध करा, मग निवडणुका घ्या. अन्यथा लोकशाहीचा विश्वासच ढळेल.”

यावेळी राज ठाकरेंनी दुबार मतदारांची सविस्तर आकडेवारी सादर करत सभेत उपस्थित जनतेसमोर प्रत्यक्ष यादी वाचून दाखवली. “हे लोक म्हणतात पुरावे कुठे आहेत, म्हणून मी आज पुरावेच घेऊन आलो आहे,” असं सांगत राज ठाकरेंनी आकडे मांडले. त्यांनी सांगितले की, मुंबई उत्तर मतदारसंघात एकूण १७ लाख २९ हजार ४५६ मतदार असून त्यापैकी ६२ हजार ३७० दुबार आहेत. मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात १६ लाख ७४ हजार ८६१ पैकी ६० हजार २३१ मतदार दुबार आहेत. मुंबई उत्तर-पूर्व मतदारसंघात १५ लाख ९० हजार ७१० पैकी तब्बल ९२ हजार ९८३ दुबार मतदार सापडले आहेत. मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात १६ लाख ८१ हजार ०४८ मतदारांपैकी ६३ हजार ७४० दुबार आहेत, तर दक्षिण-मध्य मुंबईत १४ लाख ३७ हजार ७७६ पैकी ५० हजार ५६५ आणि दक्षिण मुंबईत १५ लाख १५ हजार ९९३ पैकी ५५ हजार २०५ दुबार मतदार असल्याचं त्यांनी सांगितलं.

मुंबईपलीकडेही अशीच परिस्थिती असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं. “नाशिक लोकसभेत १९ लाख ३४ हजार ३४९ पैकी ९९ हजार ६७३, मावळ लोकसभेत १९ लाख ८५ हजार १७२ पैकी तब्बल १ लाख ४५ हजार ६३६, पुणे लोकसभेत १७ लाख १२ हजार २४२ पैकी १ लाख २ हजार ०२ आणि ठाणे मतदारसंघात तब्बल २ लाख ९ हजार ९८१ दुबार मतदार आहेत,” असं सांगत त्यांनी आकडे वाचून दाखवले.

ते पुढे म्हणाले, “कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडी येथील सुमारे साडेचार हजार मतदारांनी तिथे मतदान केलं आणि मुंबईच्या मलबार हिलमध्येही मतदान केलं आहे. अशा लाखो नावांचा वापर मतदानासाठी केला गेला आहे.”

सभेत राज ठाकरेंनी एका उंचवट्यावर ठेवलेल्या गठ्ठ्यांकडे इशारा करत म्हटलं, “हे आहेत ते पुरावे, जे निवडणूक आयोग मागत होता. हे सर्व दुबार मतदारांचे दस्तऐवज आहेत. आता तपास करायची वेळ आली आहे.”

दरम्यान, या सभेला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते — उद्धव ठाकरे, शरद पवार, अशोक चव्हाण, जयंत पाटील आदी उपस्थित होते. विरोधकांनी ‘मतदारयाद्यांचा घोटाळा’ या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांना कोपऱ्यात पकडले असताना, आता निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निवडणुकांत दुबार मतदार दिसला की बडवून काढा – राज ठाकरे

दरम्यान, येत्या निवडणुकांमध्ये जर दुबार मतदार दिसला, तर तिथल्या तिथे बडवून काढा, असं आवाहन राज ठाकरेंनी उपस्थित कार्यकर्त्यांना केलं. “जेव्हा कधी निवडणुका होतील, तेव्हा याद्यांवर तुम्ही सगळे काम करा. चेहरे कळले पाहिजेत. जर त्यानंतर हे दुबार-तिबारवाले आले, तर तिथेच फोडून काढायचे. बडव बडव बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे. त्याशिवाय हे वठणीवर येणार नाहीत”, असं राज ठाकरे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here