जळगाव समाचार | ११ जानेवारी २०२६
मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचा क्षण पाहायला मिळाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त भव्य सभा मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत पार पडत आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सभेत राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका करत, “अख्खी मुंबई, महाराष्ट्र आणि देश विकायला काढला आहे,” असा गंभीर आरोप केला.
सभेच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी ठाकरे कुटुंबीयांच्या स्मृतींना उजाळा देत भावनिक भाषण केले.
“या व्यासपीठावर मी अनेकदा बाळासाहेब ठाकरे, माझे वडील श्रीकांत ठाकरे, आजोबा प्रबोधनकार ठाकरे आणि माँ यांच्यासोबत उभा राहिलो आहे. आज दोन भाऊ एकत्र आलो आहोत, हा क्षण ते सर्व पाहत असतील,” असे सांगत त्यांनी मराठी अस्मितेचा सूर लावला.
२० वर्षांनंतर पहिली युती; नाराजांची दिलगिरी
राज ठाकरे म्हणाले, “मी २० वर्षांनंतर पहिल्यांदा युती करतो आहे. या प्रक्रियेत अनेकांना उमेदवारी देता आली नाही. त्यामुळे काही जण नाराज झाले, काहींनी दुसरा मार्ग निवडला. या गोष्टी आमच्या हातात नसतात. मात्र, कोणी दुखावले गेले असतील तर त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो.”
यावेळी त्यांनी सूचक टोलाही लगावत, “आज जे गेले आहेत, ते परत येतील,” असे म्हटले.
मी आणि उद्धव एकत्र का आलो?
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामागचे कारण स्पष्ट करताना राज ठाकरे म्हणाले,
“मी आणि उद्धव एकत्र आलो याचं कारण म्हणजे मुंबईवर आलेलं संकट. कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. हिंदी सक्तीचा विषय केवळ मराठी माणूस जागा आहे का, हे चाचपडण्यासाठी आणला गेला. मीही कडाडलो आणि उद्धवही कडाडले. तिथूनच या एकत्र येण्याची सुरुवात झाली.”
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्ताधाऱ्यांना आलेल्या ‘अतिआत्मविश्वासावर’ टीका करत ते म्हणाले,
“पैसे फेकले की जनतेला विकत घेऊ, असा आत्मविश्वास कुठून आला? कुणालाच विचारायचं नाही, मनमानी सुरू आहे.”
भाजपावर गंभीर आरोप
भाजपावर थेट आरोप करताना राज ठाकरे म्हणाले,
“अकोटमध्ये भाजपाने एमआयएमसोबत युती केली, बदलापूरमध्ये काँग्रेससोबत. ६६ नगरसेवक बिनविरोध निवडून आले, म्हणजे तिथल्या मतदारांचा अधिकारच हिरावून घेतला गेला. वाईट वाटतं की लोक विकले जातात.”
तसेच त्यांनी तुळजापूर आणि बदलापूरमधील उदाहरणे देत, ड्रग रॅकेट व बलात्कार प्रकरणातील आरोपींना उमेदवारी व नगरसेवकपद देण्यात आल्याचा आरोप केला.
“ही मस्ती, हा उद्दामपणा कुठून आला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अदाणी प्रकल्पांची आकडेवारी दाखवत सरकारवर निशाणा
सभेदरम्यान ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत राज ठाकरे यांनी उद्योगपती गौतम अदाणी यांच्या प्रकल्पांची आकडेवारी दाखवली.
“२०१४ मध्ये आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अदाणींच्या प्रकल्पांमध्ये किती वाढ झाली, हे पाहा. अख्खा देश विकायला काढला आहे. हे पाहूनही जर आपल्याला भीती वाटत नसेल, तर पुढे निवडणुका न लढवलेल्या बऱ्या,” असा इशारा त्यांनी दिला.
राजकीय वातावरण तापले
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना, ठाकरे बंधूंची ही संयुक्त सभा महत्त्वाची मानली जात आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना, मराठी अस्मिता, मुंबईचा स्वाभिमान आणि सत्तेच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित करणारी ही सभा आगामी राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकणारी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

![]()




