जळगाव समाचार | २७ मे २०२५
भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. २७ मेपासून विशेषतः किनारी भाग, दक्षिण कर्नाटक आणि मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण, घाटमाथा, मुंबई आणि पुणे या भागांमध्ये मान्सूनने २६ मे रोजीच हजेरी लावली आहे.
३ तासांत धोका – नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पुढील ३ तासांत काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. वाऱ्यांचा वेग ताशी ५० ते ६० किमीपर्यंत जाऊ शकतो, अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. नागरिकांनी घरात राहावे आणि सुरक्षितता पाळावी, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
दक्षिण भारतातही मुसळधार पाऊस
उत्तर कर्नाटकात २७ ते ३० मे दरम्यान अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे. तामिळनाडूमध्ये ३१ मेपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि पावसाचा जोर कायम राहणार आहे.
केरळमध्ये मोठे नुकसान
केरळमध्ये पावसामुळे आतापर्यंत २९ घरे उद्ध्वस्त झाली असून ८६८ घरे अंशतः नुकसानग्रस्त झाली आहेत. २७ मे रोजी वादळ, अतिवृष्टी आणि ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
मुंबईत भरतीचा इशारा
मुंबईमध्ये आज दुपारी १२.१४ वाजता समुद्रात ४.९२ मीटर उंचीची भरती येणार आहे, जिथे सुमारे १५ फूट उंच लाटा उसळू शकतात. रात्री ११.५४ वाजता दुसरी भरती ४.०८ मीटर उंचीची असणार आहे. हवामान खात्याने उद्याही मुंबईसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.
राज्यभरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी हवामान खात्याचे इशारे लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घ्यावी. अधिकृत सूचनांसाठी स्थानिक प्रशासनाच्या माहितीवर लक्ष ठेवावे असे आवाहन करण्यात आले आहे.