जळगाव समाचार डेस्क| ११ ऑगस्ट २०२४
जळगाव जिल्ह्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे जिल्ह्यातील पिकांची स्थिती अत्यंत चांगली झाली आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, यावर्षी शेतकऱ्यांच्या हाती चांगला हंगाम येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ४५१ मिलिमीटर (अपेक्षित ३७६ मिलिमीटर) पाऊस झाला आहे, जो ११० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. रावेर आणि यावल तालुक्यांत १०९ टक्क्यांहून अधिक पाऊस झाल्याने या तालुक्यांनी शंभरी पार केली आहे. यामुळे कपाशी, उडीद, आणि मुगाच्या पिकांची स्थिती अत्यंत जोमदार झाली आहे. कपाशीला फुले लागली असून, उडीद व मुगाला शेंगा लागल्या आहेत.
कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक के. एम. तडवी यांनी सांगितले की, “जून महिन्यात पावसाची ओढ होती, पण जुलै आणि ऑगस्टमध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे पिकांची वाढ जोरात झाली आहे. फक्त पावसाने काही काळ उघडीप दिल्यास पिकांची वाढ अधिक जोमाने होईल आणि शेंगांचे भरणे अधिक उत्तम होईल.”
जिल्ह्यातील तालुकानिहाय पावसाचे आकडेवारी अशी आहे: रावेर १०९.९%, यावल १०९%, जळगाव ९७.१%, मुक्ताईनगर ९७%, चोपडा ८७.५%, बोदवड ८६.२%, भुसावळ ६२.४%, धरणगाव ६३.८%, पाचोरा ३०.७%, जामनेर ३९.०%, पारोळा ३२.०%, भडगाव ३३.४%, चाळीसगाव २६.९%, एरंडोल २६.६% आणि अमळनेर ४३.२%.
मात्र, काही भागांमध्ये, विशेषत: जिथे जमिन खोलगट आहे, तिथे पाण्याचे साचलेले असल्याने पिकांना धोका निर्माण झाला आहे. तसेच, मागील आठवड्यात जळगाव आणि चोपडा तालुक्यात झालेल्या संततधार पावसामुळे २६६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, त्याचे पंचनामे पूर्ण करून अहवाल जिल्हाधिकारी व राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे.
कृषी विभागाच्या मते, यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हाती चांगला हंगाम येण्याची शक्यता आहे, आणि त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.
तालुकानिहाय झालेला पाऊस (टक्क्यांमध्ये)
जळगाव–९७.१
भुसावळ–६२.४
यावल–१०९
रावेर–१०९.९
मुक्ताईनगर–९७
अमळनेर–४३.२
चोपडा–८७.५
एरंडोल–२६.६
पारोळा–३२.०
चाळीसगाव–२६.९
जामनेर–३९.०
पाचोरा–३०.७
भडगाव–३३.४
धरणगाव–६३.८
बोदवड–८६.२
एकूण–६२.३