जळगाव समाचार | १६ एप्रिल २०२५
भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुविधांसाठी आणखी एक ऐतिहासिक पाऊल उचललं आहे. देशात पहिल्यांदाच एका ट्रेनमध्ये एटीएम मशीन बसवण्यात आलं असून, ही सेवा मुंबई-मनमाड दरम्यान धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये सुरू करण्यात आली आहे.
या एटीएममुळे आता प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख रकमेची चिंता करावी लागणार नाही. बँक ऑफ महाराष्ट्राचे हे एटीएम ट्रेनच्या एका कोचमध्ये बसवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हे एटीएम चालत्या ट्रेनमध्येही सुरळीतपणे काम करू शकतं.
मनमाड रेल्वे वर्कशॉपमध्ये खास डिझाइन करण्यात आलेल्या या एटीएमसाठी मजबूत शटर दरवाज्याची सुरक्षा यंत्रणा देखील तयार करण्यात आली आहे. इलेक्ट्रिकल आणि स्ट्रक्चरल डिझाइन इतकं मजबूत आहे की, हाय स्पीड ट्रेनमध्येही हे एटीएम व्यवस्थित काम करतं.
रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितलं की, “आज सकाळी पंचवटी एक्सप्रेस एटीएम कोचसह मुंबईत पोहोचली. हा एक अनोखा उपक्रम आहे. आम्हाला आशा आहे की ही सुविधा प्रवाशांसाठी उपयुक्त ठरेल.”
पंचवटी एक्सप्रेस ही CSMT (मुंबई) ते MMR (मनमाड) दरम्यान धावणारी सुपरफास्ट ट्रेन असून, दररोज हजारो प्रवासी या गाडीतून प्रवास करतात. ही सुविधा विशेषतः त्यांच्यासाठी उपयोगी ठरणार आहे.
रेल्वेच्या या नव्या उपक्रमामुळे प्रवास अधिक सुलभ व सुरक्षित होणार असून, भविष्यात अशा सुविधा इतर गाड्यांमध्येही सुरु होण्याची शक्यता आहे.