जळगाव समाचार | १५ डिसेंबर २०२५
निवडणूक हेराफेरी आणि मतचोरीच्या विरोधात काँग्रेसने देशभरात आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील रामलीला मैदानावर 14 डिसेंबर रोजी काँग्रेसकडून भव्य जनसभेचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका करण्यात आली.
जनसभेत बोलताना राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगावर थेट निशाणा साधला. मतचोरीच्या मुद्द्यावर सरकारकडे कोणतीही ठोस उत्तरे नाहीत, असा आरोप करत त्यांनी सांगितले की, “मी संसदेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सरकारकडे नव्हती. म्हणूनच अमित शाह संसदेत थरथर कापत होते.” सध्या सुरू असलेली लढाई ही “सत्ता विरुद्ध सत्य” अशी असून, सत्याच्या बाजूने उभे राहून नरेंद्र मोदी, अमित शाह आणि आरएसएस-भाजपला सत्तेवरून हटवू, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. निवडणूक आयोग आता स्वतंत्र व निष्पक्ष संस्था राहिलेली नसून, सरकारशी संगनमत करून निर्णय घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, निवडणूक आयुक्तांना संरक्षण देणाऱ्या नव्या कायद्यावर टीका करत, हा कायदा लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे ते म्हणाले. “तुम्ही भारताचे निवडणूक आयुक्त आहात, नरेंद्र मोदींचे नाही,” असे स्पष्ट शब्दांत सांगत, काँग्रेस सत्तेत आल्यास हा कायदा बदलून अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.
यावेळी राहुल गांधी यांनी आरएसएस आणि त्यांचे प्रमुख मोहन भागवत यांच्यावरही टीका केली. भारतीय संस्कृतीचा पाया सत्यावर आधारित असल्याचे सांगत, “सत्यम् शिवम् सुंदरम्” या मूल्यांचा उल्लेख त्यांनी केला. मात्र, आरएसएसच्या विचारसरणीत सत्याला स्थान नसून, सत्ता आणि अधिकारालाच सर्वोच्च प्राधान्य दिले जाते, असा आरोप त्यांनी केला. देशातील विविध भागातील नागरिक या संघर्षात सहभागी होत असल्याचे नमूद करत, हीच भारतीय लोकशाहीची खरी ताकद असल्याचे राहुल गांधी यांनी अधोरेखित केले.

![]()




