जळगाव समाचार | १८ सप्टेंबर २०२५
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मतदान प्रक्रियेतील मोठ्या घोटाळ्याचा आरोप केला. त्यांनी यावेळी काही प्रत्यक्ष उदाहरणांसह दस्तऐवजी पुरावे सादर करत निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
राहुल गांधी म्हणाले, “मी विरोधी पक्षनेता आहे. हलक्या-फुलक्या स्वरुपात मी असं काही बोलत नाही. माझ्याकडे ठोस पुरावे आहेत. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त अशा लोकांचे संरक्षण करत आहेत, ज्यांनी लोकशाहीला धक्का दिला आहे. प्रत्येक निवडणुकीवेळी दलित, आदिवासी, ओबीसी व अल्पसंख्याकांचे मत कमी करण्याचा नियोजनपूर्वक प्रयत्न होतो. याचा आता १०० टक्के पुरावा आमच्याकडे आहे.”
कर्नाटकमधील आलंद मतदारसंघातील धक्कादायक प्रकरण
पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी कर्नाटकमधील आलंद मतदारसंघातील घटना उघड केली. २०२३ मध्ये या मतदारसंघातील ६,०१८ मतदारांची नावे यादीतून वगळण्यासाठी अर्ज दाखल झाले होते. मात्र, हे अर्ज संबंधित मतदारांनी कधीच केले नव्हते. तपासात हे अर्ज ऑटोमॅटिक सॉफ्टवेअरच्या मदतीने भरले गेल्याचे स्पष्ट झाले.
या अर्जांसाठी वापरण्यात आलेले मोबाईल क्रमांक कर्नाटकबाहेरील विविध राज्यांमधील असल्याचंही समोर आलं. “काँग्रेस जिंकण्याची शक्यता असलेल्या मतदान केंद्रांवरच हे प्रकार घडले. काँग्रेसची मतं कमी करण्यासाठीच ही कारस्थानं रचली गेली,” असा दावा राहुल गांधींनी केला.
मतदारांच्या नावाने खोटे अर्ज
गांधींनी काही उदाहरणेही दिली. “गोदाबाई नावाच्या महिलेच्या नावाने अर्ज दाखल करण्यात आला. पण त्या म्हणतात, ‘मी असा अर्ज केलेलाच नाही.’ एका व्यक्तीच्या बनावट लॉगइनमधून एकाच वेळी १२ अर्ज भरले गेले. एवढं सगळं झालं तेव्हा वापरण्यात आलेले मोबाईल क्रमांक नेमके कुणाचे? ओटीपी कुणी घेतले?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
१४ मिनिटांत १२ अर्ज
पत्रकार परिषदेत सूर्यकांत नावाच्या व्यक्तीचे प्रकरण समोर आले. त्यांच्या नावावरून केवळ १४ मिनिटांत १२ मतदारांचे नाव वगळण्याचे अर्ज दाखल झाले. त्या यादीत बबिता चौधरी यांचेही नाव होते. दोघांनाही व्यासपीठावर आणून राहुल गांधींनी प्रत्यक्ष परिस्थिती दाखवली.
सूर्यकांत म्हणाले, “माझ्या नावाने १२ मतदारांचे अर्ज झाले, पण मला काहीच माहिती नाही. मी कधी कुणाला मेसेजही पाठवलेला नाही. बबिता चौधरींनी विचारल्यावर मला हे प्रकरण समजलं.”
राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत स्पष्ट शब्दांत आरोप केला की, मतं वाढवणे किंवा कमी करणे ही मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली प्रक्रिया आहे. आता पुरावा आमच्याकडे आहे. मी फक्त पुरावे मांडतोय; निर्णय देशाच्या जनतेचा आहे असे ते म्हणाले.