जळगाव समाचार | २१ मार्च २०२५
हिंजवडी येथील व्योम ग्राफिक्स या कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हलरला लागलेल्या आगीमागील खळबळजनक सत्य उघडकीस आले आहे. ही आग अपघाताने नव्हे, तर चालकानेच सुडभावनेतून लावल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या घटनेत चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
सोमवारी (१८ मार्च) सकाळी हिंजवडी फेज वन परिसरात व्योम ग्राफिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला अचानक आग लागली. काही क्षणातच गाडीने पेट घेतला आणि चार कर्मचाऱ्यांचा गाडीतच होरपळून मृत्यू झाला. सहा कामगार गंभीर भाजले, तर चालक आणि चार जणांनी उड्या मारून आपला जीव वाचवला.
प्राथमिक तपासात ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर या घटनेत वाहनचालक जनार्दन हंबर्डीकर (५६, रा. कोथरूड) याचा थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
चालक हंबर्डीकर याचा कंपनीतील काही कर्मचाऱ्यांशी वाद सुरू होता. त्याचबरोबर दिवाळीमध्ये कंपनीने त्याचा पगार कपात केल्यामुळे तो नाराज होता. याच रागातून त्याने गाडी पेटवण्याचा कट रचला.
मंगळवारी (१८ मार्च) त्याने कंपनीतून ‘बेंजिम सोल्युशन’ हे ज्वलनशील केमिकल एका प्लास्टिकच्या बाटलीत भरले आणि गाडीत ठेवलं. त्याचबरोबर कापडाच्या चिंध्या सीटखाली लपवल्या. बुधवारी सकाळी कर्मचाऱ्यांना आणण्यासाठी जाताना त्याने वारजे येथे एका दुकानातून काडीपेटी विकत घेतली.
गाडी हिंजवडी फेज वन परिसरात पोहोचताच त्याने अचानक ब्रेक दाबला आणि पेटती काडी कापडाच्या चिंध्यांवर टाकली. ज्वलनशील केमिकलमुळे काही क्षणांतच गाडीत भीषण आग लागली. स्वतःला वाचवण्यासाठी चालकाने तत्काळ गाडीतून उडी मारली.
घटनेनंतर पोलिसांनी सखोल तपास करत हंबर्डीकरला अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या या क्रूर कृत्यामुळे चार जणांना आपले प्राण गमवावे लागले असून, सहा जण मृत्यूशी झुंज देत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.