जळगाव समाचार | १६ एप्रिल २०२५
तनिषा भिसे या गरोदर महिलेला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी १० लाखांचे डिपॉझिट मागितल्यामुळे उपचारास उशीर झाला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. या घटनेमुळे राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सपकाळ यांनी म्हटले की, “साडेपाच तास ताटकळत ठेवून मातृत्वासाठी आसुसलेल्या एका महिलेचा बळी गेला. हे हृदयद्रावक आहे.” त्यांनी थेट मंगेशकर कुटुंबावर टीका करत म्हटले की, “इतक्या मोठ्या घटनेवर मंगेशकर कुटुंबाचे मौन अमानुष आणि असंवेदनशील आहे. त्यांनी माफी मागावी आणि मृत महिलेच्या कुटुंबीयांना धीर द्यावा.”
त्याचबरोबर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही मंगेशकर कुटुंबावर गंभीर आरोप करत म्हटले की, “मंगेशकरांनी रुग्णालयासाठी मदत घेतली, पण गरिबांसाठी काहीही करत नाहीत. रुग्णालयातील सातवा माळा त्यांच्या कुटुंबासाठी राखीव आहे. रुग्णांची लूट सुरू आहे, चॅरिटीच्या नावाखाली व्यावसायिक पद्धतीने पैसे घेतले जात आहेत.”
या प्रकरणानंतर दीनानाथ रुग्णालयावर पैसे मागण्याच्या तक्रारी वारंवार होत असल्याचाही उल्लेख सपकाळ यांनी केला. त्यांनी सरकारवरही टीका करत म्हटले की, “सरकार दीनानाथ रुग्णालयाचीच बाजू घेत आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे.”