जळगाव समाचार | ३१ ऑगस्ट
मराठी तसेच हिंदी मालिकांमधील अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे (वय ३९) यांचे आज निधन झाले. मागील दोन वर्षांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
प्रिया मराठे यांनी ‘चार दिवस सासूचे’ या मराठी मालिकेत प्रमुख भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. ‘तुझेचं गीत मी गात आहे’, ‘तू तिथे मी’ या मालिकांमधील त्यांच्या भूमिका देखील विशेष गाजल्या. हिंदी मालिकांपैकी पवित्र रिश्ता या मालिकेत त्यांनी केलेल्या भूमिकेने त्यांना वेगळी ओळख मिळवून दिली.
छोट्या पडद्यासह नाट्यक्षेत्रातही त्यांनी आपली छाप सोडली. A Perfect Murder या नाटकातील त्यांच्या अभिनयाचीही विशेष दखल घेण्यात आली होती.
मनमोकळं हसणारी, अभिनयाची जाण असलेली आणि प्रेक्षकांशी नातं निर्माण करणारी अभिनेत्री अशी प्रिया मराठे यांची ओळख होती. त्यांच्या अचानक जाण्याने मराठी रंगभूमी व मालिकाविश्वात पोकळी निर्माण झाली आहे.