जळगाव समाचार डेस्क | २७ सप्टेंबर २०२४
आपल्या भावाचा संस्थेचा चेअरमन असल्याचा धाक दाखवून शिपायाला १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या प्रभारी मुख्याध्यापकास पारोळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गौतम बालूप्रसाद मिसर (वय ५१) असे या मुख्याध्यापकाचे नाव असून, त्याच्यावर पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौतम मिसर हे नागरी एज्युकेशन सोसायटी माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूलमध्ये प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा भाऊ या संस्थेचा अध्यक्ष आहे. शिपाई अविनाश पाटील यांना नोकरीत टिकवण्यासाठी मिसर यांनी १० हजार रुपयांची लाच मागितल्याचे उघड झाले आहे. शिपाई अविनाश पाटील यांनी या प्रकाराबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दाखल केली होती.
गौतम मिसर यांनी लाचेची रक्कम शाळेतील शिक्षक सचिन पाटील अथवा धर्मेंद्र शिरोडे यांच्याकडे देण्यास सांगितल्याचे एसीबीच्या पडताळणीत समोर आले. या माहितीच्या आधारे गुरुवारी दुपारी सापळा रचण्यात आला आणि गौतम मिसर यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौतम मिसर हे संस्थेत गेल्या २९ वर्षांपासून उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत, तसेच मागील तीन महिन्यांपासून प्रभारी मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्या या लाचखोरीमुळे शिक्षण संस्थेची प्रतिमा मलिन झाली असून, या घटनेचा तपास पारोळा पोलिस करत आहेत.