जळगाव समाचार | ३ मार्च २०२५
आज माझ्याकडे काय नाहीये… गाडी आहे. बंगला, क्लास वन पती आहे… मात्र आजकाल कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येत नाही… त्यामुळे मैत्रिणींनो मस्त जगा… छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा… तुलना करू नका…’ असा भावनिक संदेश समाजमाध्यमांवर शेअर करणाऱ्या 28 वर्षीय प्रतीक्षा समाधान पाटील यांचे 27 फेब्रुवारी रोजी कर्करोगाने दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या या पोस्टने अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या आहेत.
प्रतीक्षा पाटील या कुसुंबा (ता. जळगाव) येथील स्वामी समर्थ विद्यालय प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे शिक्षण एम.ए. डी.एड झालेले होते. त्यांच्या वडिलांनी, मनोज आत्माराम पाटील यांनी ग. स. पतसंस्थेचे माजी अध्यक्षपद भूषवले आहे.
प्रतीक्षा यांचा विवाह अवघ्या 24 व्या वर्षी यावल वनविभागातील क्लास वन वनाधिकारी समाधान पाटील यांच्याशी झाला होता. दोघेही जळगाव येथे वास्तव्यास होते. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या जिभेवर फोड निर्माण झाला. तीन महिने उपचार सुरू असतानाही फोड बरा होत नव्हता. पुढील तपासणीत जिभेवर गाठ असल्याचे निदान झाले. अधिक तपासणीअंती ही गाठ कर्करोगाची असल्याचे स्पष्ट झाले आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
या जीवघेण्या आजाराविरुद्ध त्या धैर्याने लढत राहिल्या. अवघ्या वीस दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली, ज्यामध्ये त्यांची जीभ काढण्यात आली. त्यामुळे त्यांचे वजन दहा किलोने घटले आणि त्या बोलू शकत नव्हत्या. या कठीण प्रसंगातही त्यांनी समाजमाध्यमांवर सकारात्मक विचार शेअर करत महिलांना जीवनाचा आनंद घ्या, असा संदेश दिला.
“जीवन जगा… आनंदी राहा” – मृत्यूपूर्वीचा हृदयस्पर्शी संदेश
मृत्युपूर्वी त्यांनी एक हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली होती, ज्यात त्यांनी म्हटले होते – “मैत्रिणींनो, आपण सगळ्यांकडे लक्ष देतो आणि स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करतो. आयुष्यात सगळे समोर असताना प्रकृती चांगली असेल तरच आपण त्याचा आनंद घेऊ शकतो; पण मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना… त्याला जीवनाची किंमत कळते. तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा… जीवन जगा…”
त्यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पती, वडील, आई, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. जाता जाता सकारात्मक विचार देऊन त्या अनंतात विलीन झाल्या.