जळगाव समाचार | २९ एप्रिल २०२५
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, निर्माते आणि चित्रकार प्रकाश भेंडे यांचे मंगळवारी निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर दुपारी दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
प्रकाश भेंडे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील मुरूड-जंजिरा येथे झाला. त्यांचे बालपण गिरगावात गेले. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांनी सुरुवातीला टेक्स्टाईल डिझायनर म्हणून काम केले आणि नंतर चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.
‘भालू’ या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी पत्नी उमा भेंडे यांच्यासोबत प्रमुख भूमिका केली. या चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी ‘चटकचांदणी’, ‘आपण यांना पाहिलंत का’, ‘प्रेमासाठी वाट्टेल ते’, ‘आई थोर तुझे उपकार’ यांसारखे चित्रपट तयार केले.
ते केवळ अभिनेते आणि निर्मातेच नव्हते तर एक उत्कृष्ट चित्रकारही होते. त्यांच्या चित्रांचे अनेक प्रदर्शन मुंबईतील गॅलरींमध्ये भरवण्यात आले होते. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीने एक बहुपैलू कलाकार गमावला आहे.