जळगावात उद्यापासून‘प्रगतीशील महाराष्ट्र २०२५’ प्रदर्शनाचे आयोजन; केंद्र-राज्य सरकारच्या योजनांची माहिती जनतेसमोर खा. स्मिताताई वाघ यांचा पुढाकारः दिल्लीच्या फ्रेंड्ज एक्झीबिशन अँड प्रमोशनच्यावतीने आयोजन

जळगाव समाचार | १ नोव्हेंबर २०२५

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश व राज्य प्रगतीच्या नव्या वाटचालीवर आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजना व उपक्रमांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘प्रगतीशील महाराष्ट्र २०२५’ या तीन दिवसीय भव्य प्रदर्शनाचे आयोजन जळगावमध्ये करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सोमवार, दि. ३ नोव्हेंबर ते बुधवार, दि. ५ नोव्हेंबर या कालावधीत शिवतीर्थ (जी.एस. ग्राऊंड), जळगाव येथे भरविण्यात येणार आहे. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचा पुढाकार खा. स्मिताताई वाघ यांनी घेतला असून आयोजन दिल्लीच्या फ्रेंड्ज एक्झीबिशन अँड प्रमोशन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन दि. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते होणार असून या वेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, तसेच आमदार राजूमामा भोळे, मंगेश चव्हाण, अनिल पाटील, किशोर आप्पा पाटील, अमोल पाटील, चंद्रकांत सोनवणे, चंद्रकांत पाटील आणि अमोल जावळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रदर्शन सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच या वेळेत सर्वांसाठी खुले असणार आहे.

प्रदर्शनाबाबत माहिती देताना खा. स्मिताताई वाघ म्हणाल्या की, “या प्रदर्शनात केंद्र आणि राज्यातील विविध विभागांच्या योजना व उपक्रमांविषयी माहिती देणारे स्टॉल्स असतील. कृषी व ग्रामीण विकास, विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण, आयुष, मत्स्यपालन, महाऊर्जा, भारतीय मानक ब्युरो, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, भारतीय विमान प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, तसेच जळगाव महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन आणि कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ-इनक्युबेशन सेंटर यांसारख्या अनेक संस्था व विभाग सहभागी होणार आहेत.” त्यांनी पुढे सांगितले की, “ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा सुरेख संगम असलेले हे प्रदर्शन जळगावकरांसाठी खरीखुरी जनजागरण पर्वणी ठरणार आहे.” या पत्रकार परिषदेला भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, भाजप जिल्हाध्यक्ष (पश्चिम) डॉ. राधेश्याम चौधरी, तसेच फ्रेंड्ज एक्झीबिशनच्या संचालिका अखिला श्रीनिवासन, संचालक आनंद पाल, दीपकसिंग मेहता आणि साक्षी सैनी उपस्थित होते.

या प्रदर्शनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सहभागाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी शोध प्रकल्प स्पर्धा आयोजित करण्यात आली असून जळगाव जिल्ह्यातील सुमारे आठ शाळा आणि महाविद्यालयांचे प्रकल्प प्रदर्शनात मांडले जाणार आहेत. विज्ञान व तंत्रज्ञानातील नवकल्पक प्रयोग सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. अशा प्रकारचे सर्वसमावेशक आणि माहितीपूर्ण प्रदर्शन जळगावात पहिल्यांदाच होत असल्याने नागरिकांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here