जळगाव समाचार | १३ फेब्रुवारी २०२५
महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी प्रथमच आयोजित केलेल्या पत्रकार प्रीमियर लीग पर्व १ चा समारोप सोहळा दिनांक १२ फेब्रुवारी रोजी जळगावातील शिवतीर्थ मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला. तीन दिवस चाललेल्या या रंगतदार क्रिकेट स्पर्धेत चाळीसगाव संघाने अंतिम सामन्यात जळगाव प्रिंट मीडिया संघावर विजय मिळवत विजेतेपदावर मोहोर उमटवली.
शिवतीर्थ मैदानावर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवले. अंतिम लढतीत चाळीसगाव संघाने उत्कृष्ट फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर जळगाव प्रिंट मीडिया संघावर विजय मिळवला आणि विजयी चषक उंचावला.
या सामन्याला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी स्पर्धेच्या माध्यमातून पत्रकारांमधील खेळाडूवृत्तीला प्रोत्साहन मिळाल्याचे सांगत, “पत्रकारांनी आपल्या धावपळीच्या जीवनात स्वतःसाठी वेळ काढून खेळ आणि आरोग्याकडेही लक्ष द्यावे,” असे मत व्यक्त केले.
समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, धरणगावचे नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेना (उबाठा) महानगराध्यक्ष शरद तायडे, महाराष्ट्र पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम, जैन उद्योग समूहाचे अनिल जोशी, रमेशकुमार मुनोत, विक्रम मुनोत, तसेच नामांकित पत्रकार व मान्यवर उपस्थित होते.
पहिल्यांदाच महाराष्ट्रात पत्रकारांसाठी क्रिकेट स्पर्धा
पत्रकारांसाठी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा हा पहिलाच उपक्रम होता. या अनोख्या स्पर्धेचे उद्घाटन जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, माजी मंत्री आ. अनिल पाटील, आ. राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या उपस्थितीत झाले. पहिल्याच दिवशी दिवसरात्र पद्धतीने ८ सामने खेळवले गेले.
महसूल, पोलीस आणि पत्रकार यांच्यात मैत्रीपूर्ण सामने
स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी जळगाव पोलीस विरुद्ध संपादक आणि महसूल विभाग विरुद्ध आयोजक समिती यांच्यात मैत्रीपूर्ण सामने खेळवले गेले. जळगाव पोलीस संघाने संपादक संघावर सहज विजय मिळवला, तर आयोजक समितीने महसूल संघावर शेवटच्या षटकात विजय मिळवत सामन्याचा थरार वाढवला. या सामन्यांमध्ये पोलिसांनी पत्रकारांची भूमिका साकारत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकारांवर प्रश्नांची सरबत्ती करत वातावरण हलकं-फुलकं केलं.
स्पर्धेतील विजेते आणि विशेष पुरस्कार
• विजेता संघ – चाळीसगाव संघ
• उपविजेता संघ – जळगाव प्रिंट मीडिया संघ
• तृतीय क्रमांक – अमळनेर संघ
• चतुर्थ क्रमांक – धरणगाव संघ
• मॅन ऑफ द सिरीज – आर. जे. पाटील (अमळनेर)
• सर्वोत्कृष्ट गोलंदाज – रवींद्र कोष्टी (चाळीसगाव)
• सर्वोत्कृष्ट फलंदाज – महेश पाटील (चाळीसगाव)
या स्पर्धेत जळगाव प्रिंट मीडिया, युट्युब मीडिया, वेब मीडिया, डिजिटल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, फोटोग्राफर, संपादक संघ, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, अमळनेर, चोपडा, यावल, धरणगाव, मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर, चाळीसगाव, पाचोरा या ठिकाणांहून पत्रकार संघांनी सहभाग घेतला.
पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री आ. अनिल पाटील यांनीही मैदानावर उतरून खेळाचा आनंद लुटला.
या अनोख्या स्पर्धेच्या आयोजनामुळे राज्यभरातील पत्रकारांसाठी खेळ, आरोग्य आणि संवादाचा नवीन दुवा निर्माण झाला, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.