व्हॅटिकन सिटी, कॅथोलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन…

जळगाव समाचार | २१ एप्रिल २०२५

कॅथोलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे आज निधन झाले आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी ७:३५ वाजता त्यांनी वयाच्या ८८व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती व्हॅटिकन कार्डिनलने दिली. पोप फ्रान्सिस हे इतिहासातील पहिले लॅटिन अमेरिकन पोप होते.

१४ फेब्रुवारी रोजी त्यांना रोमच्या जेमेली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना न्यूमोनिया व अशक्तपणा यांचा त्रास होता. तब्येत खालावल्याने त्यांना पाच आठवडे रुग्णालयात ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांच्यात मूत्रपिंड निकामी होण्याची लक्षणे आणि प्लेटलेट्सची कमतरता आढळली होती. काही काळानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला होता, मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली.

पोप फ्रान्सिस यांचा जन्म १७ डिसेंबर १९३६ रोजी अर्जेंटिनामधील फ्लोरेन्स येथे झाला. पोप होण्यापूर्वी ते ‘जॉर्ज मारियो बर्गोग्लिओ’ या नावाने ओळखले जात होते. ते सोसायटी ऑफ जीझस (जेसुइट्स) या संघटनेचे सदस्य होते आणि युरोपबाहेरून निवडले गेलेले पहिले पोप होते. २०१३ मध्ये त्यांनी पोपपदाची सूत्रे हाती घेतली.

त्यांनी ब्यूनस आयर्स विद्यापीठातून तत्वज्ञान आणि धर्मशास्त्रात शिक्षण घेतले होते. १९९८ मध्ये ते ब्यूनस आयर्सचे आर्चबिशप बनले आणि २००१ मध्ये पोप जॉन पॉल द्वितीय यांनी त्यांना कार्डिनल म्हणून नियुक्त केले.

पोप फ्रान्सिस हे आपल्या उदारमतवादी विचारसरणीसाठी प्रसिद्ध होते. समलैंगिक व्यक्तींविषयी बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते, “जर कोणी समलैंगिक व्यक्ती देवाचा शोध घेत असेल, तर मी त्यांना जज करणारा कोण?” तसेच घटस्फोटित कॅथोलिक व्यक्तींना त्यांनी पुनर्विवाहासाठी धार्मिक मान्यता दिली आणि सहभोजनाचा अधिकारही दिला.

चर्चमधील बाल लैंगिक शोषणाच्या मुद्द्यावर त्यांनी उघडपणे माफी मागितली होती. २०१४ मध्ये त्यांनी या प्रकरणांची कबुली दिली आणि ते गुन्हे म्हणजे नैतिकतेचा ऱ्हास असल्याचे ठामपणे सांगितले. तसेच, त्यांनी पीडितांनाही भेट देत कॅथोलिक चर्चना माफी मागण्याचे आवाहन केले होते.

पोप फ्रान्सिस यांचे नेतृत्व, विचारसरणी आणि समाजप्रती असलेली संवेदनशीलता कायम स्मरणात राहील. त्यांच्या जाण्याने संपूर्ण ख्रिश्चन धर्मसमूहावर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here