जळगाव समाचार डेस्क | ८ सप्टेंबर २०२४
बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे आयएएस अधिकारी बनलेल्या पूजा खेडकरवर यूपीएससीने कठोर कारवाई करत तिला आयएएस सेवेतून बडतर्फ केले आहे. पूजा खेडकरने आयएएस पदासाठी जमा केलेली कागदपत्रं खोटी असल्याचं समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात खटलाही सुरू आहे.
गेल्या आठवड्यात यूपीएससीने पूजा खेडकरची निवड रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु तांत्रिक अडचणींमुळे हा निर्णय तत्काळ लागू होऊ शकला नाही. मात्र आता तिच्या बडतर्फीचा निर्णय अधिकृतपणे घेण्यात आला आहे.
पूजा खेडकरला 26 सप्टेंबरपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, केंद्र सरकारच्या बडतर्फीच्या निर्णयामुळे तिच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणाबाबत माहिती अधिकारी विजय कुंभार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “आयएएस अधिकाऱ्यांसाठी हा निर्णय चपराक आहे. पूजा खेडकरप्रमाणेच अनेकांनी खोटी कागदपत्रं सादर करून पदं मिळवली आहेत, त्यांच्यावरही कारवाई होणं आवश्यक आहे.”
नेमकं प्रकरण काय?
पूजा खेडकर ही 2023 बॅचची आयएएस अधिकारी होती. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत तिने 841 वा क्रमांक पटकावला होता. काही महिन्यांपूर्वी ती पुणे जिल्ह्यात सहायक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आली होती. परंतु, प्रशिक्षणाच्या काळात तिच्या वर्तनावरून तिला वाशिम येथे बदली करण्यात आली.
पूजा खेडकरने दृष्टिदोष प्रवर्गातून UPSC परीक्षा दिली आणि मानसिक आजाराचे बोगस प्रमाणपत्र सादर केले होते. या सवलतीच्या आधारे तिला आयएएस पद मिळाले. तिची वैद्यकीय तपासणी सहा वेळा बोलवूनही ती अनुपस्थित राहिली. तपासात असे उघडकीस आले की, तिने आपले नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव आणि इतर महत्त्वाचे तपशील खोटे सादर करून यूपीएससीची फसवणूक केली आहे.
यामुळे यूपीएससीने तिच्या विरोधात कठोर पाऊल उचलत, तिला आयएएस पदावरून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे.