जळगाव समाचार | १८ मार्च २०२६
स्वतःला ज्योतिषी तसेच ‘कॅप्टन’ म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या अशोक खरात याला गंभीर लैंगिक अत्याचाराच्या आरोपांप्रकरणी नाशिक क्राइम ब्रँचने बुधवारी पहाटे अटक केली. या कारवाईनंतर खरातच्या कथित गैरकृत्यांबाबत धक्कादायक तपशील समोर आले असून शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात हा नाशिकमधील कॅनडा कॉर्नर परिसरात कार्यालय चालवत होता. येथे तो ज्योतिष सांगण्याच्या बहाण्याने महिलांना बोलावून त्यांच्याशी अयोग्य वर्तन करत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. कार्यालयातील काळ्या काचांच्या बंदिस्त जागेचा गैरवापर करून महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. काही महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधश्रद्धा आणि भविष्य जाणून घेण्याच्या नावाखाली त्याने त्यांच्यावर मानसिक तसेच शारीरिक अत्याचार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणात एका पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित महिलेच्या म्हणण्यानुसार, तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून खरातला अटक केली.
तपासादरम्यान पोलिसांनी जप्त केलेल्या पेन ड्राइव्हमधून सुमारे ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओंच्या आधारे आणखी काही महिलांचे शोषण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून अधिक तक्रारी पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून संबंधित सर्व पुरावे तपासले जात आहेत.
अशोक खरातने सिन्नर तालुक्यात ‘श्री शिवनिका संस्थान’ नावाचे मंदिर स्थापन केल्याची माहिती आहे. या संस्थेच्या माध्यमातून त्याने सामाजिक व धार्मिक वर्तुळात संपर्क वाढवला होता. या मंदिराशी काही राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा संबंध असल्याचीही चर्चा आहे. यापूर्वी काही मान्यवरांनी या ठिकाणी भेट दिल्याची माहिती समोर आली असली, तरी या प्रकरणाशी त्यांचा थेट संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीच्या नावाखाली होणाऱ्या गैरप्रकारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागरिकांनी अशा व्यक्तींवर आंधळा विश्वास न ठेवता सतर्क राहावे, तसेच संशयास्पद प्रकारांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन नाशिक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

![]()




