राज्यात पोलिसाची गळा आवळून हत्या, चौघे ताब्यात; सात दिवसात दुसऱ्या पोलिसाच्या हत्येने खळबळ…


जळगाव समाचार | ३१ मार्च २०२५

जालना जिल्ह्यात महामार्ग पोलिस विभागात कार्यरत असलेल्या ज्ञानेश्वर म्हस्के यांची अज्ञात आरोपीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, देऊळगाव राजा तालुक्यात सात दिवसांत पोलिसाच्या हत्येची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

गुढीपाडव्यानिमित्त ज्ञानेश्वर म्हस्के शनिवारी त्यांच्या मूळ गावी आले होते. काही कामानिमित्त ते गिरोलीहून देऊळगाव राजा येथे गेले, मात्र रात्री उशिरापर्यंत परतले नाहीत. त्यांच्या पत्नीने फोन केला, पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशन ट्रेस करून तपास केला असता, सिंदखेडराजा रोडवरील आर जे इंटरनॅशनल स्कूलसमोर वन विभागाच्या हद्दीत त्यांची कार आढळली.

पोलिसांनी कार तपासली असता, आतून लॉक असलेल्या गाडीतच त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी मनीषा कदम, पोलीस निरीक्षक संतोष महल्ले आणि अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तपासासाठी श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीम पाचारण करण्यात आली. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

सात दिवसांत दुसरी हत्या, चौघे ताब्यात

२३ मार्च रोजी अवैध दारू विक्री करणाऱ्या आरोपीचा पाठलाग करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली होती. आता ७ दिवसांत दुसऱ्या पोलिसाची हत्या झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौघा संशयितांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. लवकरच हत्येचा उलगडा होईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here