धक्कादायक; अकोल्यात शाळेतील कर्मचाऱ्याकडून १० विद्यार्थिनींचा विनयभंग…


जळगाव समाचार | ३ एप्रिल २०२५

अकोला शहरातील कौलखेड येथील मॉ रेणुका मराठी प्राथमिक शाळेत एका कर्मचाऱ्याने तब्बल १० विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खदान पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

शाळेतील काही महिला शिक्षिका ५ मार्चपासून प्रशिक्षणासाठी बाहेरगावी गेल्या होत्या. याचा गैरफायदा घेत हेमंत चांदेकर या कर्मचाऱ्याने चौथी ते सातवीच्या विद्यार्थिनींना त्रास दिला. शिक्षिका परत आल्यानंतर विद्यार्थिनींनी धाडसाने हा प्रकार सांगितला, तेव्हा संपूर्ण शाळेत खळबळ माजली.

या प्रकारानंतर शाळेच्या संचालिका पल्लवी कुलकर्णी यांनी चाइल्ड हेल्पलाइनला कळवले. त्यानंतर महिला समन्वयक हर्षाली गजभिये यांनी ३० मार्च रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे खदान पोलिसांनी हेमंत चांदेकर याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५, ८, ९(एफ)(एम) पॉक्सो कायद्याच्या कलम १० बाल न्याय अधिनियम २०२५ च्या कलम ७५ अन्वये गुन्हा दाखल केला.

बालकल्याण समितीनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून ३१ मार्च रोजी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. या घटनेमुळे शाळकरी मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here