जळगाव समाचार डेस्क। २२ ऑगस्ट २०२४
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या जळगाव (Jalgaon) दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जळगाव विमानतळापासून 50 किलोमीटर क्षेत्रात ‘नो फ्लाईंग झोन’ जाहीर केला आहे. या झोनची अंमलबजावणी 22 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यान करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढलेल्या आदेशानुसार, या क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या हवाई वाहनांचे उड्डाण पूर्णतः बंद करण्यात आले आहे. यात ड्रोन, पॅराग्लाइडर्स, मायक्रोलाइट्स, खाजगी हेलिकॉप्टर, पॅरामोटर, हॉट एअर फुगे यांचा समावेश आहे. ‘नो फ्लाईंग झोन’चे क्षेत्र “205741N”, “0753729E” या निर्देशांकांच्या परिघातील 50 किलोमीटर पर्यंत आणि 4000 फूट उंचीपर्यंत मर्यादित असेल.
तसेच, पंतप्रधानांच्या दौऱ्याशी संबंधित महत्वाचे किंवा अति महत्वाचे विमानांचे उड्डाण वगळता, 24 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजल्यापासून ते 25 ऑगस्टच्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सर्व व्यावसायिक उड्डाणांवर बंदी राहील. यामुळे जळगाव विमानतळावरुन होणारी व्यावसायिक उड्डाणे या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत.
सुरक्षेच्या दृष्टीने कडक उपाययोजना करण्यात येत असून, नागरिकांनी या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 25 ऑगस्ट रोजी जळगाव येथे होणाऱ्या ‘लखपती दीदी’ कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, ज्यामुळे या निर्णयाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

![]()




