अहमदाबादमध्ये भीषण विमान दुर्घटना : एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलाइनर कोसळले; अनेकांच्या मृत्यूची भीती

 

जळगाव समाचार | १२ जून २०२५

अहमदाबादमध्ये आज दुपारी एक भीषण विमान अपघात झाला. एअर इंडियाचे लंडनला जाणारे बोईंग ड्रीमलाइनर ७८७ प्रवासी विमान सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काहीच मिनिटांत रहिवासी भागात कोसळले. या अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी हे विमान २४२ प्रवाशांना घेऊन लंडनसाठी उड्डाण करत होते. उड्डाणानंतर थोड्याच वेळात तांत्रिक बिघाड झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नियंत्रण सुटल्याने हे विमान अहमदाबाद शहरातील मेघानी भागात एका रहिवासी इमारतीवर आदळले.

या दुर्घटनेनंतर परिसरात प्रचंड आग लागली असून, विमानाच्या इंधन टाक्या भरलेल्या असल्यामुळे आगीने भीषण रूप धारण केले. अपघातामुळे अनेक वाहनं जळून खाक झाली असून काही इमारती कोसळल्याचीही माहिती आहे. दुर्घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर काळ्या धुराचे लोट आकाशात पसरले होते.

घटनास्थळी अहमदाबाद अग्निशमन दल, पोलीस व बचाव पथक पोहचले असून, युद्धपातळीवर मदत व बचाव कार्य सुरू आहे. सीआयएसएफच्या माहितीनुसार, विमान थेट निवासी इमारतीवर आदळल्यामुळे अनेक नागरिकही जखमी किंवा मृत्यूमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

राज्य पोलीस नियंत्रण कक्ष आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी उपस्थित असून, अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे. प्रवाशांची यादी व मृत्यू झालेल्या किंवा जखमी झालेल्यांची अधिकृत नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत.

अधिकृत सूत्रांकडून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here