जळगाव समाचार | १४ नोव्हेंबर २०२५
जळगाव शहरातील सरदार वल्लभभाई पटेल हॉल (लेवा भवन) पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आला असून, पियुष पाटील यांनी माजी महापौर विष्णू रामदास भंगाळे यांच्यावर तब्बल २० कोटी रुपयांच्या बेकायदेशीर कमाईचे गंभीर आरोप केले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली ही जागा मनपाची ‘ओपन स्पेस–ग्रीन झोन’मधील मालकीची असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तरी दोन दशकांपूर्वी मनपाने खासगी संस्थेला “गेम हॉल” उभारण्यासाठी ती दिल्यामुळे या ठिकाणी खासदार, आमदार आणि DPDC निधीतून विकासकामे करण्यात आली.
पाटील यांनी सांगितले की लेवा भवनमध्ये दरवर्षी शंभराहून अधिक विवाहसोहळे आणि व्यापारी कार्यक्रम होतात. प्रत्येक लग्नासाठी ८० हजार ते १ लाख रुपये आणि योगा–झुंबा क्लासेससाठी दरमहा ५० हजार रुपये आकारले जात असल्याचा दावा त्यांनी केला. या उत्पन्नाच्या आधारे गेल्या २० वर्षांत सुमारे २० कोटी रुपयांची कमाई झाली असून, त्या बदल्यात मनपाला किती रक्कम जमा केली याचा खुलासा भंगाळे यांनी करावा, अशी मागणी त्यांनी केली. समाजाच्या नावावर उभारलेल्या हॉलचा वैयक्तिक आणि राजकीय फायद्यासाठी वापर करणे हे समाजाच्या सन्मानाला धक्का असल्याचा आरोपही त्यांनी नोंदवला.
दरम्यान, विष्णू भंगाळे यांनी दिलेले निवडणूक लढण्याचे आव्हान स्वीकारल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. “मी माझ्या नावाने तक्रार अर्ज दिलेला असून त्यात काहीही गुप्त नाही. त्यांनी जाहीर आव्हान दिले असल्यास मी तयार आहे,” असे ते म्हणाले. तसेच, या प्रकरणात त्यांनी कोणतीही भीती न बाळगता आगामी काळात सर्व पुरावे जनतेसमोर ठेवण्याचे आश्वासन दिले.
भंगाळे यांच्यावर निवडणुकीत फसवणूक केल्याचा आरोपही पाटील यांनी केला. “माझ्या वडिलांच्या विरोधात लढताना त्यांच्या प्रभागात ३८०० बोगस मतदारांचा शोध लागला होता. पराभवाची शक्यता ओळखून त्यांनी माघार घेतली. आता पुन्हा सुमारे २५०० बोगस मतदारांची नावे समाविष्ट असल्याचे आमच्या निदर्शनास आले असून, याचा लवकरच खुलासा करणार आहोत,” असे पाटील यांनी म्हटले. “भंगाळे हे केवळ बोगस मतदानाच्या जोरावर निवडून येतात. आम्ही याबाबत कायदेशीर हरकत घेऊन सत्य बाहेर आणणार आहोत,” असे ते ठामपणे म्हणाले.

![]()




