जळगाव समाचार | १९ फेब्रुवारी २०२५
पाचोरा शहरात एका किरकोळ कारणावरून तरुणाचा चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बाहेरपुरा भागात १८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२:३० वाजता घडली. हेमंत संजय सोनवणे (वय २०, रा. जुना माहेजी नाका, महात्मा फुले नगर, पाचोरा) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात रोहित गजानन लोणारी (वय २०, रा. शिव कॉलनी, पाचोरा) याने हेमंतवर धारदार चाकूने वार केले.
१८ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शिव जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक १२:१५ वाजता संपल्यानंतर हेमंत सोनवणे बाहेरपुरा भागात गेला. यावेळी रोहित लोणारी याने किरकोळ कारणावरून त्याच्याशी वाद घालून अचानक धारदार चाकूने पोटात वार केले आणि घटनास्थळावरून फरार झाला.
घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक पवार आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या हेमंतला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी जळगावला हलविण्यात आले. उपचारादरम्यान हेमंतचा मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात रोहित लोणारी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. हेमंतचा खून नेमका कोणत्या कारणावरून करण्यात आला? याचा तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या घटनेमुळे पाचोरा शहरात खळबळ माजली आहे. एका किरकोळ कारणावरून झालेल्या या हत्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून शहरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.