जळगाव समाचार | ३१ मार्च २०२५
पारोळा शहरातील हत्ती गल्ली आणि राजेसंभाजी चौक परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, गटारांचे पाणी घरात शिरत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्येबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही नगरपालिका प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे, अशी नागरिकांची तक्रार आहे.
गटार तुंबल्याने नागरिकांचे हाल
या भागातील गटारी साफ न केल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर पसरत आहे आणि आता थेट घरात घुसत आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. घाणीमुळे दुर्गंधी आणि साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. पाणी साचल्याने ये-जा करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
अर्ज दिले पण प्रशासनाकडून दुर्लक्ष
या समस्येबाबत संजय राजधर चौधरी यांनी पारोळा नगरपालिकेला वेळोवेळी अर्ज दिले, मात्र प्रशासनाने त्याकडे कोणतीही दखल घेतली नाही. सततच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
प्रशासनाला नागरिकांची आर्त हाक
नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना आजारी पडण्याचा धोका वाढत आहे. पालिका प्रशासनाने त्वरित गटारींची स्वच्छता करून या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. नगरपालिका प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष द्यावे, अन्यथा जनतेचा रोष पत्करावा लागेल! असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

![]()




