विमा रकमेच्या हव्यासामुळे मेव्हण्यानेच केला शालकाचा खून, पोलिसांच्या तपासात आरोपींची दाणादाण; दोघे आरोपी अटकेत…

जळगाव समाचार | २९ एप्रिल २०२५

जळगाव जिल्ह्यातील पारोळा परिसरात एका तरुणाचा अपघात झाल्याचे सांगून विमा रक्कम मिळवण्याच्या हेतूने त्याचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फागणे येथील सख्या मेव्हण्यानेच हा कट रचून शालकाचा खून केला होता. पारोळा पोलिसांनी सखोल तपास करत २७ एप्रिल रोजी दोघा आरोपींना अटक केली. या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

१७ एप्रिल रोजी रात्री ११.३० च्या सुमारास समाधान शिवाजी पाटील (वय २६) याचा अपघात झाल्याची माहिती देत धुळे पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. ही नोंद झिरो नंबरने पारोळा पोलिस ठाण्यात पाठवण्यात आली. १९ एप्रिल रोजी या घटनेची ‘अकस्मात मृत्यू’ म्हणून नोंद करण्यात आली.

मात्र, पोलीस उपनिरीक्षक अमरसिंह वसावे आणि त्यांच्या तपास पथकाने घटनास्थळी जाऊन तपास केला असता, अपघाताच्या जागेचा स्वरूप व पुरावे हे संशयास्पद वाटले. यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल चौकशी करण्यात आली.

तपास दरम्यान संशयित आणि त्यांच्या नातेवाइकांचे मोबाईल कॉल रेकॉर्ड्स (CDR) तपासण्यात आले. या तपासातून संदीप पाटील याने दिलेली माहिती आणि प्रत्यक्षदर्शी पुराव्यांमध्ये तफावत आढळून आली. याच दरम्यान पारोळा, अमळनेर आणि धुळे येथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आणि खऱ्या घटनेचा उलगडा झाला.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत स्पष्ट झाले की, समाधान पाटीलच्या नावे असलेल्या विमा पॉलिसी आणि स्कुटीच्या अपघात विम्याचा लाभ घेण्यासाठी त्याच्या मेव्हण्यानेच खून केला होता. या कटात त्याला एका साथीदाराचीही मदत मिळाली होती.

या गुन्ह्याचा पर्दाफाश करताच पारोळा पोलिसांच्या तपासाची प्रशंसा सर्वत्र होत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे.

तपास पथकात उपनिरीक्षक अमरसिंह वसावे, हवालदार सुनील हटकर, किशोर भोई, संजय पाटील, अनिल राठोड आणि अभिजीत पाटील यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here