(विक्रम लालवाणी), प्रतिनिधी पारोळा
पारोळ्यात मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने पायी चालणे ही जिकरी चे झाले आहे. शहरात आज रविवारी परंपरेनुसार खान्देश कुलस्वामिनी कानबाई मातेची उत्साहात स्थापना होणार असुन सोमवारी सकाळी विसर्जन मिरवणुक काढण्यात येईल,सदर मिरवणुक ज्या मार्गाने निघते त्या मार्गासह संपूर्ण बाजारपेठेच खड्डेमय झाले आहे. खड्यात पाणी साचल्याने उत्सव मिरवणूकीत हे खड्डे अपघातास विघ्न ठरु नये, अशीच प्रार्थना करण्यात येत आहे. नगरपालिकेने लक्ष देऊन खड्डे त्वरीत बुजवावित अशी मागणी माता कान्हबाई भक्तांनी केली आहे.
खान्देश सह शहरात आज कुलस्वामिनी कानबाई माता उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे.या उत्सवासाठी राज्यभरातून भाविक देवीचा दर्शनासाठी येत असतात.
नागपंचमी नंतरचा येणाऱ्या रविवारी म्हणजेच आज कानबाई मातेची स्थापना घरोघरी होत असते व दुसऱ्या दिवशी सोमवारी विसर्जन मिरवणूक काढण्यात येते.उत्सव मिरवणूकीत महिला वर्ग,तरूण,तरुणी, अबाल वृद्ध मोठ्या संख्येने सामिल होऊन झिम्मा फुगडी व नाचण्याचा आनंद घेतात. दरम्यान सदर उत्सव मिरवणुक ही राम मंदिर चौक,कासार गणपती चौक,रथ चौक,गावहोळी चौक, नगरपालिका चौक,तलाव गल्ली या मुख्य मार्गावरून काढण्यात येत असल्याने या मार्गावरच ठिकठिकाणी मोठमोठी खड्डे पडून पावसाचे पाणी साचले आहे. तर देवी विसर्जन ठिकाणी (वडा जवळ) मोठी व खोलवर खड्डे पडल्याने या खड्यांमुळे अपघात अथवा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून नगरपालिका प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन खड्डे बुजविण्यात यावी अशी मागणी शहरवासियांकडून होत आहे.