(विक्रम लालवाणी), पारोळा प्रतिनिधी:
पारोळा येथील बस स्थानकातील ठक्कर बाजार कॉम्प्लेक्समधील कालिंका जनरल स्टोअर्स या दुकानाला ४ सप्टेंबर रोजी रात्री १०:३० वाजता शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत लाखो रुपयांच्या मालाचे नुकसान झाले आहे. वेळीच आग लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.
प्रमोद भावसार यांच्या मालकीचे कालिंका जनरल स्टोअर्स या दुकानात रात्री अचानक शॉर्टसर्किटमुळे पंखा व फ्रिज जळाले, ज्यामुळे दुकानातून धुराचा लोंडा बाहेर येऊ लागला. ही घटना बस स्थानकात फिरणाऱ्या नागरिकांनी आणि सुरक्षा रक्षक नाना पाटील यांनी पाहून त्वरित दुकानमालकांना कळवली. त्याच वेळी फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन आग आणखीनच वाढली. यानंतर अमोल भावसार, दीपक भावसार, प्रा. संजय भावसार, प्रवीण जगताप, निंबा मराठे, बारी भाऊ, महेंद्र दानेज, अमोल महाजन, मोहित शिंदे, नानू मराठे, तुषार भावसार, राहुल महाजन, सोनू पाटील आणि महेश महाजन या उपस्थित नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
नगरपालिकेचे अग्निशामक दल अर्ध्या तासात घटनास्थळी पोहोचले आणि आग पूर्णपणे विझवली. वेळीच प्रयत्न केल्याने आजूबाजूच्या दुकानांचे नुकसान टळले. मात्र, कालिंका जनरल स्टोअर्स मधील सर्व माल, फर्निचर आणि फ्रिज आदी वस्तू जळून खाक झाल्या. अंदाजे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे.
शहर तलाठी निशिकांत माने आणि इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
बस स्थानकातील अग्निसुरक्षा सुविधांचा अभाव:
पारोळा बस स्थानकात सुमारे ३० ते ४० दुकाने आहेत आणि रात्रीच्या वेळेस ८ ते १० बसेस येथे मुक्कामी असतात. मात्र, बस स्थानकात अग्निरोधक सिलेंडर किंवा अन्य आवश्यक सुरक्षा साधनांची कमतरता आहे. दुकानातील ही आग मोठ्या प्रमाणात पसरू शकली असती. त्यामुळे लवकरात लवकर बस स्थानकात अग्निरोधक साहित्य बसवावे, अशी मागणी येथील दुकानदार आणि नागरिकांनी केली आहे.

![]()




