पारोळा तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या…

0
40

 

(विक्रम लालवाणी), पारोळा प्रतिनिधी

तालुक्यातील हिरापुर येथील ३८ वर्षीय शेतकरी महेंद्र विनायक सोनवणे यांनी सततच्या नापिकीमुळे आणि कर्जबाजारीपणाच्या विवंचनेत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सदर घटना २२ सप्टेंबर रोजी दुपारी उघडकीस आली असून याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महेंद्र सोनवणे यांच्याकडे दोन बिघे जमीन होती, ज्यामध्ये यंदा कापसाचे पीक घेतले होते. मात्र, अतिपावसामुळे पीक खराब झाले आणि उत्पन्न हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली. या परिस्थितीत त्यांना वडिलांनी घेतलेले बँकेचे पीककर्ज फेडायचे कसे, याची चिंता भेडसावत होती. आठ दिवसांपूर्वीच बँकेकडून कर्ज भरण्याची नोटीसही आली होती, यामुळे ते अधिक तणावाखाली होते.

सकाळी कोणालाही काही न सांगता महेंद्र घरातून निघून गेले. दुपारपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. दीडच्या सुमारास हिरापूर शिवारातील दत्तात्रय पाटील यांच्या विहिरीजवळ त्यांचे चपला आढळून आल्या. ग्रामस्थांनी विहिरीत उतरून महेंद्र यांचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेने कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली असून गावात एकच आक्रोश झाला.

महेंद्र सोनवणे यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. शेतीवरच परिवाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या महेंद्र यांना सततची नापिकी आणि कर्ज फेडण्याची असमर्थता यामुळे आत्महत्या करावी लागली, असे कुटुंबीयांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here