पारोळ्यात किरकोळ वादातून दगडफेक; महिला पोलिस कर्मचार्यांसह नऊ पोलीस जखमी

विक्रम लालवाणी, पारोळा प्रतिनिधी| ६ ऑक्टोबर २०२४

पारोळा शहरातील श्री बालाजी महाराजांच्या यात्रोत्सवातील मिरवणुकीदरम्यान किरकोळ वादाचे रूपांतर हिंसक दंगलीत झाल्याने दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. या घटनेत महिला पोलिस कर्मचार्‍यांसह 9 पोलिस कर्मचारी जखमी झाले. घटना 3 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, श्री बालाजी महाराजांच्या ब्रह्मोत्सव मिरवणुकीचे वहन झपाट भवानी चौकात पोहोचले असताना, दुसऱ्या बाजूला दुर्गा देवी मंडळात आरती सुरू होती. याच वेळी मुलांमधील किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या गोंधळात झाले आणि अचानक दगडफेक सुरू झाली. यामुळे उपस्थित लोकांमध्ये अफरातफर उडाली, तर पोलीस बंदोबस्त कमी असल्याने जमावाला नियंत्रणात आणणे कठीण झाले.

या गोंधळात पारोळा येथील गोपनीय शाखेचे हेड कॉन्स्टेबल महेश पाटील, जळगाव येथील पोलीस उपनिरीक्षक मंजुषा तिवारी, अमरावती सीआरपीएफचे हेड कॉन्स्टेबल उमेश पुरी, आणि मानि राठोड, पोलीस कॉन्स्टेबल आशिष शिदोड यांच्यासह होमगार्ड पथकातील भटू पाटील, धोंडू लोंढे, भैय्यासाहेब पाटील, आणि ईश्वर पाटील असे नऊ पोलिस कर्मचारी जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळी परिस्थिती गंभीर झाल्याचे पाहून पारोळा पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी तातडीने अमळनेर, एंडोल, भडगाव, आणि धरणगाव येथील पोलिस पथकांना पाचारण केले. दंगा काबू पथकासही तातडीने घटनास्थळी बोलवण्यात आले.

याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात दोन्ही गटांतील 24 जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींच्या शोधासाठी तपास सुरु केला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा पोलीस करत आहेत.

तुफान दगडफेकीमुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले असून, स्थानिक प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here