1 लाखाची लाच मागणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह कंत्राटी सेवकाला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले…

0
92

विक्रम लालवाणी (पारोळा प्रतिनिधी)

पारोळा तालुक्यातील धुळपिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीटीकरण व पेव्हर ब्लॉकच्या कामांसाठी वर्क ऑर्डर काढण्यासाठी एक लाख रुपये लाच घेणाऱ्या पारोळा पंचायत समिती कार्यालयातील ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह कंत्राटी सेवकाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

धुळपिंप्री गावात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत ६० लाख रुपये किंमतीची चार विकासकामे मंजूर करण्यात आली होती. त्यामध्ये काँक्रीटीकरण व पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम होते. या कामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी पारोळा पंचायत समिती कार्यालयातील ग्रामविकास अधिकारी सुनील अमृत पाटील (वय ५८) आणि कंत्राटी सेवक कल्पेश ज्ञानेश्वर बेलदार (वय २८) यांनी एक लाख ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. कंत्राटी सेवक बेलदार याने स्वतःसाठी एक टक्का तर ग्रामविस्तार अधिकारी पाटील यांच्यासाठी दोन टक्के लाच मागितली होती.

धुळपिंप्री गावातील सरपंचांच्या मुलाने या लाच मागणीची तक्रार जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानंतर लाचलुचपत विभागाने तक्रारीची पडताळणी करून सापळा रचला.

लाचलुचपत विभागाने २० सप्टेंबर रोजी पारोळा पंचायत समिती कार्यालयात सापळा लावला. तडजोडीअंती एक लाख रुपयांची रक्कम ठरली. कंत्राटी सेवक कल्पेश बेलदार याने पंचासमोर एक लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत विभागाने त्याला रंगेहात पकडले. त्याच्याबरोबर ग्रामविस्तार अधिकारी सुनील पाटील यांनाही अटक करण्यात आली आहे.

या कारवाईमुळे पारोळा तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईचे नेतृत्व जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी केले. त्यांच्या पथकात पोहेकॉ. सुनिल वानखेडे, पोना. किशोर महाजन, पोना. बाळू मराठे यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक नैत्रा जाधव, स्मिता नवघरे, पोहेकॉ. सुरेश पाटील, रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकुर, सचिन चाटे यांनीही या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here