जळगाव समाचार | २८ ऑगस्ट २०२५
पारोळा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे बहादरपूर शिवारातील बोरी नदीच्या काठावर उभारण्यात आलेला अवैध देशी दारू कारखाना शिताफीने उध्वस्त केला. दि. २७ ऑगस्ट रोजी पोलीस निरीक्षक सचिन सिताराम सानप यांना मिळालेल्या माहितीवरून मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व मा. अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव श्रीमती कविता नेरकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विनायक बाजीराव कोते यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी छापा टाकून कारखाना जप्त केला.
सदर कारवाईत मोठ्या प्रमाणावर दारूचा साठा व कच्चामाल हस्तगत करण्यात आला. यात ९० एम.एल. मापाच्या ३१०० सीलबंद बॉटल्स (किंमत १ लाख २४ हजार), ७०० बाटल्या (२८ हजार), ८०० लिटर स्पिरीट (३ लाख ५५ हजार), १५०० लिटर तयार दारू (३ लाख), ऑटोमॅटिक आर.ओ. मशिन (५ लाख), CNC मशिन (५ लाख), टॅगो पंच बुच ३० हजार नग (७५ हजार), ९० एम.एल. च्या ६१,२०० रिकाम्या बाटल्या (६ लाख १२ हजार), पाण्याच्या टाक्या, स्टॅपीलायझर, मिक्सर मशिन आदी साहित्य जप्त करण्यात आले. याशिवाय १ बोलेरो मालवाहू गाडी (५ लाख), १ स्वीप्ट डिझायर कार (५ लाख) व ४०x४० लोखंडी पत्र्याचे शेड (५ लाख) असा एकूण ४० लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
या धाडसी कारवाईत पोलीस निरीक्षक सचिन सिताराम सानप, पोउपनि अमोल कचरु दुकळे, पोह. हवालदार सुनिल कौतिक हटकर, महेश रामराव पाटील, डॉ. शरद तुकाराम पाटील, प्रविण शालीग्राम पाटील, पोलीस अंमलदार अनिल तुळशीदास राठोड, अजय महारु बाविस्कर, आकाश काडू माळी, विजय अशोक पाटील, शेखर देविदास साळुंखे, चालक पोह. संजय लोटू पाटील, चालक पोह. वेलचंद बाबुराव पवार यांनी सहभाग नोंदविला. या कारवाईमुळे अवैध दारू निर्मिती करणाऱ्या टोळ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.