विक्रम लालवाणी, पारोळा प्रतिनिधी
पारोळा तालुक्यातील भोलाणे येथे कापसाच्या शेतात गांज्याची लागवड आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पारोळा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत 60 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, 26 ऑक्टोबर रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास पारोळा पोलीस निरीक्षक सुनिल पवार, उपनिरीक्षक अमरसिंग वसावे आणि त्यांच्या पथकाने – हवालदार सुनिल हटकर, अभिजीत पाटील, प्रवीण मांडोळे, संदीप पाटील, नंदलाल पाटील, राहुल कोळी यांनी भोलाणे येथे छापा टाकला. भाईदास दुला भिल यांच्या शेतात कापसाच्या पिकात गांज्याची लागवड केली असल्याचे आढळले. कारवाईत 6 किलो 200 ग्रॅम वजनाचा, तीन ते सहा फूट उंचीचा गांजा आणि फुले जप्त करण्यात आले.
या प्रकरणी विलास गायकवाड यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक अमरसिंग वसावे करीत आहेत.