जळगाव समाचार | ११ सप्टेंबर २०२५
शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी काही वर्षांपूर्वी पाळधी ते पाळधी सुमारे ४० किलोमीटर लांबीच्या रिंग रोडचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला असला तरी विविध अडथळ्यांमुळे प्रकल्पाची अंमलबजावणी पुढे ढकलली गेली आणि तो कागदावरच राहिला. या रिंग रोडमुळे नऊ गावांना जोडणारा पर्यायी मार्ग तयार होणार होता, ज्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वेक्षणही पूर्ण केले होते.
पाळधीपासून सुरू होणारा रस्ता फुपनगरी, ममुराबाद, आसोदा, तरसोद, नशिराबाद, कुसुंबा, मोहाडी, सावखेडा मार्गे पुन्हा पाळधीत जोडण्याची योजना होती. या मार्गामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होऊन नागरिकांचा वेळ आणि इंधन वाचणार होते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निधीसाठी मागणी करूनही प्रकल्पाची प्रत्यक्ष सुरुवात होऊ शकली नाही. दरम्यान, पाळधी ते तरसोद बाह्यवळण महामार्गाचे काम पूर्ण झाल्याने शहरातून जाणाऱ्या अवजड वाहतुकीचा मोठा भार हलका झाला असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी सांगितले की, “सध्या बाह्यवळण महामार्गामुळे प्रस्तावित रिंग रोडची तातडीची गरज उरलेली नाही. तरीही भविष्यात वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाल्यास ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा विचार केला जाईल. या प्रकल्पासाठी सुमारे एक हजार कोटींचा निधी लागणार आहे.” सध्या मात्र शासनाकडून रिंग रोडच्या प्रस्तावाकडे दखल घेतली जाण्याची शक्यता कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.