जळगाव समाचार | ३० ऑगस्ट २०२५
महायुतीने जळगाव जिल्ह्यात सर्व ११ जागा जिंकूनही विकासनिधी वाटपावरून स्वतःच्याच आमदारांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर रोष ओसंडून वाहला. “शिंदे गटाचेच आमदार वंचित राहात आहेत,” असा आरोप करत नियोजन समितीच्या बैठकीतच खडाजंगी रंगली.
शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी ग्रामीण भागाचा निधी वारकरी भवन, जिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन मशिन आणि शासकीय इमारतींवर खर्च झाल्याचा ठपका ठेवला. आमदारांना न विचारता पैसा वळवला जातोय, अशी थेट टीका त्यांनी केली.
यावर संतप्त पाटील यांनी मी पाच वर्षांचा हिशेब देऊ शकतो, अशी सफाई दिली. मात्र भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी तुम्ही पालकमंत्री आहात, आमचे म्हणणे ऐकावेच लागेल असे रोखठोक सुनावले.
याच दरम्यान पालकमंत्री पाटील यांनी सांगा मग तुमच्या देवाभाऊला… हे वादग्रस्त विधान करताच वातावरण भडकले. महायुतीतील भाजप–शिंदे गट आमदारांमध्ये निधीवाटपावरील वादंग जिल्ह्यात चर्चेचे केंद्रबिंदू ठरले आहे.