जळगाव समाचार डेस्क | २६ जानेवारी २०२५
दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते. यंदाही पद्म पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली असून त्यात महाराष्ट्रासह देशभरातील अनेक मान्यवरांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील दिग्गजांना मानाचा मुजरा
महाराष्ट्रातील डॉ. विलास डांगरे, मारुती भुजंगराव चितमपल्ली, चैत्राम पवार आणि सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांना यंदाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि प्रसिद्ध गायक पंकज उधास यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
डॉ. विलास डांगरे यांना आरोग्य क्षेत्रातील कामगिरीसाठी, तर मारुती चितमपल्ली यांना साहित्य व शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी हा सन्मान दिला जात आहे.
पद्मश्रीसाठी महाराष्ट्रातील अन्य मान्यवर
• अच्युत पालव – कलाक्षेत्र
• अरुंधती भट्टाचार्य – व्यापार व उद्योग
• अशोक सराफ – कलाक्षेत्र
• अश्विनी भिडे-देशपांडे – कलाक्षेत्र
• चैत्राम पवार – सामाजिक सेवा
• जसपिंदर नरुला – कलाक्षेत्र
• रणेंद्र मुजुमदार – कलाक्षेत्र
• सुभाष शर्मा – शेती
• वासुदेव कामत – कलाक्षेत्र
• विलास डांगरे – औषध क्षेत्र
देशभरातील मान्यवरांनाही गौरव
गोव्याचे 100 वर्षीय स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई, पश्चिम बंगालचे धकवादक गोकुल चंद्र दास, मध्य प्रदेशातील सामाजिक उद्योजिका सायली होळकर, नागालँडचे फळ शेतकरी एल. हँगथिंग, पुद्दुचेरीचे संगीतकार पी. दत्चनामूर्ती यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
पद्म पुरस्कारांचा इतिहास
पद्म पुरस्कारांची सुरुवात 1954 मध्ये करण्यात आली. हे पुरस्कार कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा, क्रीडा, वैद्यकीय सेवा, शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट योगदानासाठी दिले जातात.
पद्म पुरस्कारांचे तीन प्रकार आहेत:
1. पद्मविभूषण – कोणत्याही क्षेत्रातील विशेष योगदानासाठी.
2. पद्मभूषण – देशासाठी बहुमूल्य योगदानासाठी.
3. पद्मश्री – विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीसाठी.
गेल्या वर्षीचे प्रमुख पुरस्कारविजेते
गेल्या वर्षी माजी उपराष्ट्रपती वेंकैया नायडू, दाक्षिणात्य अभिनेते चिरंजीवी, अभिनेत्री वैजयंतीमाला, आणि भरतनाट्यम नृत्यांगना पद्मा सुब्रह्मण्यम यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
या वर्षीच्या पद्म पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन मार्च-एप्रिल महिन्यात राष्ट्रपती भवनात करण्यात येणार आहे.