पाचोऱ्यात स्टॅम्प विक्रीत गैरप्रकार; एसीबीची दोघांना रंगेहात अटक…

 

जळगाव समाचार | १८ मार्च २०२६

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जादा दराने मुद्रांक (स्टॅम्प पेपर) विक्री होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. नागरिकाच्या तक्रारीनंतर जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत स्टॅम्प विक्रेता योगेश ईश्वरलाल संघवी (४९) आणि त्याचा सहकारी प्रशांत ईश्वरलाल संघवी (५३) यांना रंगेहात पकडले. या दोघांविरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत कलम ७ व ७ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणात तक्रारदारास वैयक्तिक कामासाठी पाच हजार रुपयांच्या स्टॅम्प पेपरची आवश्यकता होती, त्यासाठी तो जामनेर-पाचोरा रस्त्यावरील ‘प्रशांत झेरॉक्स’ या दुकानात गेला होता.

तक्रारदाराने अधिकृत दराने स्टॅम्प मागितले असता विक्रेता योगेश संघवी याने पाच हजार रुपयांच्या स्टॅम्पसाठी थेट ५५०० रुपये मागितले. शासनाने दर निश्चित केलेले असतानाही अतिरिक्त रक्कम का आकारली जात आहे, अशी विचारणा केल्यावर “स्टॅम्प हवे असतील तर जादा पैसे द्यावे लागतील,” असे स्पष्ट सांगण्यात आले. तसेच आधारकार्ड नसल्याचे कारण देत व्यवहार टाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या प्रकारामुळे संशय आल्याने तक्रारदाराने तात्काळ जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. प्राथमिक पडताळणीत आरोप सत्य आढळल्यानंतर एसीबीच्या पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला.

ठरल्याप्रमाणे तक्रारदार पुन्हा संबंधित दुकानात गेला असता आरोपींनी पुन्हा ५०० रुपये जादा मागणी कायम ठेवली. तक्रारदाराकडून अतिरिक्त रक्कम स्वीकारण्याच्या क्षणीच, आरोपींच्या सूचनेनुसार सहकाऱ्याने पैसे घेत असताना दबा धरून बसलेल्या एसीबी पथकाने दोघांनाही रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांनी पार पाडली असून पथकात कर्मचारी बाळू मराठे आणि भूषण पाटील यांचा सहभाग होता. पुढील तपासाची जबाबदारी पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या कारवाईमुळे पाचोरा शहरातील बेकायदेशीर मुद्रांक विक्रीवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत असून, शासकीय व्यवहारात अतिरिक्त रक्कम मागितल्यास तात्काळ तक्रार करण्याचे आवाहन विभागाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here