जळगाव समाचार डेस्क। १९ ऑगस्ट २०२४
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात खडकदेवळा बु. येथे जनावरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतात सोडलेल्या इलेक्ट्रीक शॉकचा फटका बसल्याने योगेश शिवाजी गायकवाड (वय ३०) या तरुणाचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले, मात्र संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत पोलिस पाटील आणि काही कर्मचारी गंभीर जखमी झाले. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित शेतकरी धर्मराज श्रावण पाटील यांना अटक करण्यात आली आहे.
खडकदेवळा येथील शेतकरी धर्मराज श्रावण पाटील यांनी आपल्या शेतात मक्याची पेरणी केली होती. रात्रीच्या वेळी जंगली प्राण्यांकडून शेतातील पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी दि. १६ ऑगस्ट रोजी शेतात विजेचा करंट सोडला होता. मध्यरात्रीच्या सुमारास योगेश शिवाजी गायकवाड हा शेतात गेला असता, त्याला विजेचा जोरदार शॉक लागला. शॉक इतका जबरदस्त होता की योगेशचा जागीच मृत्यू झाला.
शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर, ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस पाटीलांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली, त्यानंतर योगेशचा मृतदेह पाचोरा येथे हलवण्यात आला. रविवारी योगेशच्या कुटुंबियांनी पाचोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, धर्मराज श्रावण पाटील यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना अटक करण्यात आली.
घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यावर, संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. या हल्ल्यात पोलिस पाटील आणि काही कर्मचारी गंभीर जखमी झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांनी पाचोरा पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि परिस्थितीची पाहणी केली.
संपूर्ण घटनेमुळे खडकदेवळा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून, परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

![]()




