जळगाव समाचार | ११ सप्टेंबर २०२५
जिल्ह्यात लाचखोरीची प्रकरणे वाढत असून, पाचोरा येथील सहाय्यक महसूल अधिकारी गणेश बाबुराव लोखंडे (वय ३७) यांना १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना बुधवारी रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पडली.
लोखंडे हे पाचोरा उपविभागीय अधिकारी कार्यालयात सहाय्यक महसूल अधिकारी पदावर कार्यरत आहेत. तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे कोकडी (ता. पाचोरा) शिवारातील ‘पोट खराब’ क्षेत्र असल्याने त्यांना नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई आणि कर्ज मिळत नव्हते. त्यामुळे गाव नमुना नंबर ७/१२ वर वहितीखाली नोंदणीसाठी त्यांनी कार्यालयात अर्ज केला असता लोखंडे यांनी १५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराने प्रारंभी पाच हजार रुपये रोख दिले आणि उर्वरित रकमेबाबत त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तपासात लोखंडे यांनी ही रक्कम स्वीकारल्याचे कबूल केले. त्यानुसार सापळा कारवाईदरम्यान त्यांनी दुसऱ्या हप्त्याच्या स्वरूपात १० हजार रुपये स्वीकारले असता त्यांना पंचासमक्ष अटक करण्यात आली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी हेमंत नागरे, पोलीस शिपाई भूषण पाटील, राकेश दुसाने, अमोल सुर्यवंशी आणि भारत तांगडे यांनी पार पाडली. भ्रष्टाचारासंबंधी माहिती असल्यास किंवा लाचेची मागणी झाल्यास नागरिकांनी तातडीने विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.