जळगाव समाचार डेस्क | २२ जानेवारी २०२५
शहराजवळील राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने मामा-भाच्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना २० जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडली.
चाळीसगाव तालुक्यातील चंडिकावाडी येथील ज्ञानेश्वर मंगतू राठोड (३६) व त्यांचा भाचा संकेत भरत राठोड (१८) हे दोघे जळगाव येथे काम आटोपून दुचाकीवरून चाळीसगावकडे जात होते. पहाटे ४ वाजेच्या सुमारास पाचोऱ्याजवळील निर्मल सीड्ससमोरील राष्ट्रीय महामार्गावर समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर अज्ञात वाहनचालकाने गंभीर जखमी अवस्थेतील मामा-भाच्याला तिथेच सोडून पळ काढला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात पांडुरंग मंगतू राठोड यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे करत आहेत.