शहरात ऑनलाईन फ्रॉड; टास्कच्या आमिषाला बळी पडून महाविद्यालयातील क्लार्कला ३.६० लाखांचा गंडा…

 

जळगाव समाचार | ८ नोव्हेंबर २०२५

ऑनलाईन टास्क आणि क्रिप्टो नफ्याचे आमिष दाखवून शहरातील रमेश राजाराम सोनार (वय ४५, रा. ज्ञानदेव नगर) यांची ३ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना ६ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनार हे शहरातील एका महाविद्यालयात क्लार्क म्हणून कार्यरत आहेत. ५ ऑक्टोबर रोजी त्यांना ‘टेलिग्राम’ अॅपवरून अनोळखी व्यक्तीचा मेसेज आला. व्हिडिओ आणि फोटो लाईक केल्यास प्रत्येक लाईकवर १०० रुपये मिळतील, असे आमिष त्यात दाखवण्यात आले होते. सुरुवातीच्या काही टास्कनंतर त्यांच्या खात्यात ६६० रुपये जमा झाल्याने त्यांनी त्यावर विश्वास ठेवला.

यानंतर त्यांना ‘इकॉनॉमी टास्क’ अंतर्गत बिटकॉईन आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले. काही नफा दाखवणारे मेसेज पाठवून त्यांना मोठी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले. २८ हजार रुपये गुंतवल्यास ४२ हजार मिळतील, असे सांगत त्यांनी विविध बँक खात्यांमध्ये क्रेडिट कार्डद्वारे एकूण ३ लाख ६० हजार रुपये भरले.

८ ऑक्टोबर रोजी त्यांचे ‘मिन्ट’ खाते तपासताना गुंतवणूक वाढण्याऐवजी दीड लाख रुपयांचा तोटा दाखवत असल्याचे दिसून आले. चौकशी केली असता ‘डेटा रिपेअर’ करण्यासाठी आणखी दीड लाख रुपये भरावे लागतील, असा मेसेज आला. फसवणूक झाल्याची जाणीव होताच सोनार यांनी शनिपेठ पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here