जळगाव समाचार डेस्क| ३ जानेवारी २०२५
नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका २६ वर्षीय तरुणाला तब्बल ९ लाख ८६ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. या प्रकरणी तरुणाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून भाषा मुखर्जी नावाच्या संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुप्रिम कॉलनीत राहणारा उच्चशिक्षित तरुण नोकरीच्या शोधात होता. १ डिसेंबर २०२४ रोजी भाषा मुखर्जी नाव सांगणाऱ्या व्यक्तीने त्याच्याशी ई-मेल आणि मोबाईलद्वारे संपर्क साधला. चांगली नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्या व्यक्तीने तरुणाचा विश्वास संपादन केला.
या संशयिताने वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यांवरून ९.८६ लाख रुपये उकळले. पैसे भरूनही नोकरी मिळाली नाही आणि दिलेली रक्कमही परत मिळाली नाही, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे तरुणाच्या लक्षात आले.
तरुणाने तात्काळ सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार १ जानेवारी २०२५ रोजी भाषा मुखर्जी नावाच्या व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे करत आहेत.