जळगाव समाचार डेस्क| २ ऑगस्ट २०२४
गेल्या अनेक वर्षांपासून राज्य सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन मिळावी या मागणीसाठी अनेकप्रकारे आंदोलन कर आहेत. याच धर्तीवर जळगाव (Jalgaon) जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेल्या सर्व पंचायत समिती व शाखा कार्यालयांच्या कर्मचाऱ्यांनी 1 ऑगस्ट रोजी काळ्याफिती लावून दिवसभर कामकाज करण्यात आले.
एक नोव्हेंबर 2005 किंवा त्यानंतर शासकीय नोकरीत रुजू झालेल्या शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारी कर्मचारी संघटना तर्फे लढा उभारण्यात आला आहे. याबाबत राज्य शासनाने जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचे आश्वासन देऊन देखील अद्याप पर्यंत याबाबत कोणतीही घोषणा किंवा अध्यादेश काढण्यात आलेला नसल्यामुळे या पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या निर्णय राज्य कर्मचारी संघटनेतर्फे घेण्यात आला असून याचाच एक भाग म्हणून गुरुवारी जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी काळ्याफिती लावून शासकीय कामकाज करीत शासनाच्या धोरणांचा निषेध केला. जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डी एस पाटील, सचिव सलीम पटेल यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी संघटनांतर्फे धरणे आंदोलन देखील करण्यात येणार आहे.