जळगाव समाचार डेस्क;
जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातून मोठी बातमी समोर आली आहे. इडीचे (Enforcement Directorate) अनेक गुन्हे दाखल असलेल्या अधिकाऱ्याचे अपहरण (Kidnaped) झाले असल्याने एकच खळबळ उडाली आहे. बोदवड तालुक्याचे कृषी अधिकारी (Agricultural Officer) छगन जहागीर पडवी असे अपहृत अधिकाऱ्याचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, बोदवड तालुक्याचे कृषी अधिकारी छगन जहागीर पाडवी (57) उजनी रस्त्यावर एका शेतात पीक पाहण्यासाठी जात होते. दोन किलोमीटर अंतर असताना त्यांच्या चारचाकी वाहनाला दुसऱ्या वाहनाने अडवून काही तरुणांनी तालुका कृषी अधिकारी पाडवी यांना जबरदस्ती त्यांच्या वाहनात बसवून घेऊन गेले. यावेळी पडवी यांच्या वाहन चालकाला तेथेच सोडून दिले. मात्र वाहन चालकाने कृषी कार्यालय गटात झालेल्या प्रकाराची माहिती दिली. कृषी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशन गाठले व झालेला प्रकार सांगितला.
दरम्यान कृषी अधिकारी पडवी यांना ताब्यात घेण्यासाठी कुर्ल्यातील अधिकारी बोदवड येथे आले होते. त्यापूर्वीच त्यांचे अपहरण झाले. छगन पाडवी यांच्यावर मुंबई, नवी मुंबई, पुणे, नंदुरबार, बोदवड, आणि इडी (प्रवर्तन निदेशालय) या ठिकाणी कोट्यावधी रुपयांची फसवणूक प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. नंदुरबार न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला आहे. अशी माहिती त्यांनी बोदवडचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना दिली. त्यांच्या अपहरणाबाबत रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.