निमखेडी शिवारात भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू…

जळगाव समाचार | ४ जून २०२५

जळगाव शहराजवळील निमखेडी शिवारात बुधवार, 4 जून रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे ज्ञानेश्वर झगडू शिवदे आणि प्रमोद दगडू शिवदे अशी आहेत.

कांताई नेत्रालयाजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. ज्ञानेश्वर शिवदे हे शिवसेना (शिंदे गट) महिला शहरप्रमुख ज्योती शिवदे यांचे पती होते. प्रमोद हे ज्ञानेश्वर यांचे भाऊ होते.

दोघेही पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करत होते. रोजप्रमाणे पाणीपुरीचा माल तयार करण्यासाठी ते शिवाजीनगरमधील जुन्या घरी जात असताना हा अपघात घडला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.

या अपघातामुळे शिवदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. जळगाव शहरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here