जळगाव समाचार | १५ सप्टेंबर २०२५
निंभोरा पोलीस स्टेशनच्या नेतृत्वाखाली शेतीसाठी वापरण्यात येणारे साहित्य, तोलकाट्यावरील बॅटरी व इन्व्हर्टर, मोटारसायकली, कार यांसह विविध चोरीच्या घटनांचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून निंभोरा, सावदा, यावल, रावेर आणि मुक्ताईनगर या भागात शेतीसाठी आवश्यक असलेल्या उपकरणांची व वाहनांची चोरी वाढली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीदास बोचरे यांच्या नेतृत्वाखाली नाकाबंदी, रात्रगस्त आणि आधुनिक तांत्रिक तपासाद्वारे गुप्त माहितीच्या आधारावर आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. या कारवाईत एकूण १२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून निंभोरा पोलिसांसोबत स्थानिक गुन्हे शाखेने समन्वयाने काम करत दहा गुन्हे उघडकीस आणले.
दि. ११ सप्टेंबर रोजी संशयित विलास उर्फ काल्या सुपडु वाघोदे याचा शोध घेत असताना तो पोलिसांची चाहूल लागताच पळून गेला. त्याच्या झोपडीतून मोठ्या प्रमाणावर शेतीसाठी वापरण्यात येणारे साहित्य व उपकरणे मिळून आली. त्यानंतर विचारपूस केली असता त्याने साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार मुख्य सूत्रधार स्वप्नील वासुदेव चौधरी यास ताब्यात घेऊन त्याच्या गोदामातून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये H.T.P. पंप मटेरीयल सोडण्याची मशिन, मोठ्या व लहान साईच्या बॅटऱ्या, इन्व्हर्टर, मोटारसायकली, पावर ट्रोलर व लहान ट्रॅक्टर, नॅनो कार, सोलर प्लेट, मटेरीयल बॅग, ठिबक नळ्या यांसह इतर साहित्याचा समावेश असून त्याची किंमत अंदाजे १२ लाख रुपये आहे.
या प्रकरणात मुख्य आरोपी विलास उर्फ काल्या सुपडु वाघोदे हा फरार असून त्याचे सहकारी योगीता सुनिल कोळी, गोपाळ संजय भोलनकर, आकाश मधुकर घोटकर आणि अर्जुन रतनसिंग सोळंकी यांचा समावेश आहे. चोरीचा माल विकणारे जमील अब्दुल तडवी, स्वप्नील वासुदेव चौधरी, राकेश सुभान तडवी, ललित सुनिल पाटील आणि राहुल उर्फ मयुर अनिल पाटील यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान निंभोरा पोलीस स्टेशनचे पाच गुन्हे, यावलचे दोन, तर रावेर, मुक्ताईनगर आणि सावदा येथील प्रत्येकी एक अशा एकूण दहा गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश मिळाले. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
या मोहिमेत मपोउनि दीपाली पाटील, मपोउनि ममता तडवी, पोलीस नाईक सुरेश अढायंगे, पोलीस नाईक बिजु जावरे, पोलीस नाईक रिजवान पिंजारी, पोलीस नाईक अविनाश पाटील, पोलीस नाईक किरण जाधव, पोलीस नाईक रशिद तडवी, पोलीस नाईक सर्फराज तडवी, पोलीस नाईक रफिक पटेल, पोलीस नाईक अमोल वाघ, पोलीस नाईक प्रभाकर ढसाळ, पोलीस नाईक प्रशांत चौधरी, पोलीस नाईक महेंद्र महाजन, पोलीस नाईक परेश सोनवणे, पोलीस नाईक भुषण सपकाळे, पोलीस नाईक सुभाष शिंदे यांसह चालक पोलीस नाईक योगेश चौधरी आणि पोलीस नाईक राहुल केदारे यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सोपान गोरे, पोलीस नाईक प्रितम पाटील, पोलीस नाईक यशवंत टहाकळे, पोलीस नाईक बबन पाटील, पोलीस नाईक प्रदिप चवरे, पोलीस नाईक प्रदिप सपकाळे, पोलीस नाईक मयुर निकम आणि पोलीस नाईक सचिन घुगे यांनी तपासात महत्त्वाची मदत केली.