मोठी बातमी; नाईट क्लबचे छत कोसळून अनेक सेलिब्रेटींसह 79 जणांचा मृत्यू, 160 जखमी…


जळगाव समाचार | ९ एप्रिल २०२५

सेंटो डोमिंगो (डॉमिनिकन रिपब्लिक) : मंगळवारी (दि. ८ एप्रिल) रात्री डॉमिनिकन रिपब्लिकची राजधानी सेंटो डोमिंगोमध्ये मोठी दुर्घटना घडली. येथील प्रसिद्ध जेट सेट नाईट क्लबमध्ये अचानक छत कोसळल्याने ७९ लोकांचा मृत्यू झाला असून १६० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेवेळी क्लबमध्ये ५०० ते १००० लोक उपस्थित होते. छत कोसळल्यानंतर क्लबमध्ये एकच गोंधळ उडाला. अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले असून बचाव कार्य सुरु आहे. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

आपत्कालीन ऑपरेशन सेंटरचे प्रमुख जुआन मॅन्युएल मेंडेझ यांनी सांगितले की, अजूनही काही लोक ढिगाऱ्याखाली जिवंत असण्याची शक्यता आहे. “सर्वांना बाहेर काढेपर्यंत प्रयत्न सुरु राहतील,” असे ते म्हणाले.

या दुर्घटनेत मोंटेक्रिस्टीचे गव्हर्नर नेल्सी क्रूझ आणि माजी मेजर लीग बेसबॉल खेळाडू ऑक्टाव्हियो डोटेल यांचाही मृत्यू झाला आहे.

याच कार्यक्रमात परफॉर्म करत असलेली प्रसिद्ध मेरेंग्यू गायिका रुबी पेरेझ हिचाही मृत्यू झाला. तिचे व्यवस्थापक एनरिक पॉलिनो यांनी सांगितले की, रात्री १२ च्या सुमारास कार्यक्रम सुरु झाला होता आणि त्यानंतर एक तासातच ही दुर्घटना घडली.

डॉमिनिकन रिपब्लिकचे राष्ट्राध्यक्ष लुईस अबिनाडर यांनी सोशल मीडियावर दुःख व्यक्त करत सांगितले की, “या घटनेवर आम्ही सुरुवातीपासून लक्ष ठेवून आहोत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here